उपमुख्यमंत्र्यांचे आदेश
बारामती :उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनता दरबाराच्या संकल्पनेवर आधारित नियोजन बारामती शहर आणि तालुक्यात करण्यात येणार आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचना दिल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी दिली. त्यानुसार बारामती शहर, तालुक्यात आता प्रत्येक गुरुवारी संस्थानिहाय पदाधिकाऱ्यांची उपस्थिती राहणार आहे.
उपमुख्यमंत्री पवार यांच्या सूचनेनुसार याबाबतची अंमलबजावणी उद्यापासून (दि १) सुरू होत आहे. सकाळी १०:००ते ०१:०० वाजेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस भवन कसबा येथे हा जनता दरबार भरणार आहे. या ठिकाणी पंचायत समिती, जिल्हा परिषद,मार्केट कमिटी, दूध संघ, खरेदी-विक्री संघ, सचिव संस्था, सोमेश्वर,माळेगाव,भवानीनगर कारखाना, संजय गांधी, विद्युत वितरण व पुरवठा कमिटीसह पक्ष प्रतिनिधी व सर्व संस्थांचे प्रमुखांची उपस्थिती असणार आहे. तालुक्यातील जनतेच्या अडीअडचणी शासन दरबारी सोडविण्यासाठी तसेच विकासकामे,सहकारी संस्था व कामकाज अडचणी व मदतीसाठी हे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. दर आठवड्याच्या गुरुवारी हा उपक्रम नियमितपणे चालू राहणार आहे.
तरी सर्व कार्यकर्त्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, उपक्रमास सहकार्य करून जनतेच्या सार्वजनिक, वैयक्तिक, गाव विकासाच्या व शासकीय अडचणी सोडवण्यासाठी मदत करावी, अशी सूचना दिल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष होळकर यांनी सांगितले.