पुणे : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीपुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याची चर्चा सध्या माध्यमात सुरू आहे. गेल्या काही वर्षांपासून पंतप्रधानांचे पुण्याचे दौरेही वाढले आहेत. पंतप्रधान म्हणून आतापर्यंत सर्वाधिक पुणे दौरे मोदीं यांनी केले आहेत. यापूर्वी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे गिरीश बापट या जागेवर निवडून आले होते. पण काही दिवसांपूर्वी त्यांचे निधन झाले. त्यानंतर पुण्याची जागा भाजपकडून कोण लढविणार याबद्दल तर्क वितर्क लढविले जात होते. आता या जागी खुद्द पंतप्रधानांचे नाव आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढविणार, अशी बातमी सकाळपासून विविध माध्यमांत सुरू आहे. पण याबद्दल स्थानिक पदाधिकाऱ्याकडून प्रतिक्रिया आलेली नाही. तर दुसरीकडे भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांनी थेट पंतप्रधानांना पत्र लिहले आहे. यामध्ये त्यांनी मोदींना लोकसभा निवडणूक पुण्यातून लढवण्याची मागणी केली आहे. पुण्यात सुरू झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर हे पत्र मोदी यांना लिहिल्याचे त्यांनी स्पष्टही केलं आहे.
ते पत्रात पंतप्रधानांना विनंती करत म्हणतात, जेव्हा तुम्ही गुजरात आणि उत्तर प्रदेशमधून निवडणूक लढवली तेव्हा त्या राज्यात ९० ते १०० टक्के भाजपाला यश मिळाले. पुण्यात तुमचा विजय १०० टक्के असून राज्यातही ९० ते १०० टक्के भाजपाचे असेल. पंतप्रधानांच्या कामाची पुणेकरांनी कौतुक केले आहे. त्यांची या भागात चांगली प्रसिद्धीही आहे. ते पुस्तकाच्या प्रकाशनावरून दिसले होते, त्यामुळे पंतप्रधानांनी पुण्यातून निवडणूक लढवावा, अशी विनंती काकडे यांनी केली.
यावर अजित पवारांना विचारले असता ते म्हणाले, मोदींनी निवडणूक कुठून लढायची हा त्यांचा प्रश्न आहे. पंतप्रधानांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. त्यांच्या नेतृत्वात देशाचा विकास गतीने होत आहे, असंही पवार म्हणाले.
नरेंद्र मोदी 2 मतदारसंघांमधून लढले-
नरेंद्र मोदी २०१४ साली वाराणसी आणि वडोदरा मतदारसंघांमधून निवडणूक लढले होते. तर २०१९ साली नरेंद्र मोदी वाराणसीमधून मोदी लढले होते. गिरीश बापट यांच्या निधनानंतर लोकसभेची जागा रिक्त आहे. मात्र या ठिकाणी पोटनिवडणूक होण्याची शक्यता कमी आहे.