लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महापालिकेकडून सध्या शहरातील अनेक रस्ते ‘स्मार्ट’ केले जात आहेत. पण, त्यासठी चक्क झाडांचा बळी देण्यात आला आहे. पुण्याच्या ‘आयकॉनिक’ रस्त्यांपैकी एक असलेल्या फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील दोन मोठी झाडे कापण्यात आली आहेत. ही झाडं कापायची खरंच गरज होती का, असा सवाल रहिवासी करत आहेत.
पुण्यात रस्ता सुशोभीकरण सुरू आहे? की पुण्यातली हिरवळ कशी कमी होईल यावर काम सुरू आहे, असा प्रश्न डेक्कन परिसरातील नागरिक करत आहेत. फर्ग्युसन रस्त्यावर सकाळपासून ते रात्रीपर्यंत गर्दीचा ओघ असतो. या भागात मार्केट, मॉल, कॅफे, बसस्टॉप, कॉलेज असे सगळे काही आहे. शिवाय, जुन्या पुण्याची ‘याद’ देणारी अनेक जुनी आणि मोठी झाडेही आहेत. म्हणूनच या रस्त्यावरून निवांत रपेट करणे हा पुणेकरांचा आणि पुण्यात नव्याने येणाऱ्यांचा आवडता उद्योग असतो. मात्र, या रस्त्याची मुख्य ओळख असलेल्या झाडांवरच कुऱ्हाड चालवण्याचे ‘कर्तृत्व’ महापालिकेने दाखवले आहे.
फर्ग्युसन रस्त्याच्या निर्मितीवेळी बरीच झाडे कापली गेली होती. त्यानंतर आता पदपथ सुशोभीकरणाच्या नावे झाडे तोडली गेली आहेत. सुशोभीकरणासाठी उभारल्या जाणाऱ्या कमानींना अडथळा ठरणारी दोन मोठी झाडं महापालिकेने कापली आहेत. यालाच डेक्कन जिमखाना परिसर समितीच्या नागरिकांनी आक्षेप घेतला आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार ‘ही झाडे अचानक आणि कुणालाही न सांगता तोडली गेली आहेत. रस्ते किंवा पदपथांचे सुशोभीकरण म्हणजे गरम वातावरण निर्माण करणारे लोखंडी खांब रोवणे आहे? हे कोणेत सुशोभीकरण आहे? नैसर्गिक गोष्टी संपवून आमच्या परिसरात सुशोभीकरण आम्हाला मान्य नाही.”
पदपथावर चालायला नीट जागा कधीच नसते. नेहमी कुणी ना कुणी आपले स्टॉल, काही विक्रीचे सामान घेऊन बसलेले असतात. हे रंगीबेरंगी उभे खांब लावून काय साध्य होणार आहे? ते आधी सांगावं की हे कोणत्या प्रकारचं सुशोभीकरण आहे? आज सामान्य माणसानं झाडाची एक फांदी कापली की त्याला महापालिका दंड करते. मग ही झाडंच कापून टाकायला त्यांना कोण दंड करणार, असे प्रश्न पुणेकरांनी केले आहेत.
चौकट
महापालिकेकडून समर्थन
महापालिकेने मात्र ही झाडे तोडणे योग्यच असल्याची भूमिका घेतली आहे. उद्यान विभागाचे प्रमुख अशोक घोरपडे यांच्या मते ही झाडे अडथळा ठरत असल्याने नाही तर जीर्ण झाल्यामुळे कापली गेली आहेत.