पुणे : काँग्रेस पक्षाकडून पदे मिळवून पक्षाविरोधात कारवाया करणा-यांची यापुढे गंभीर दखल घेतली जाणार आहे, संबंधितांचे अहवाल प्रदेश काँग्रेसला पाठविणार असल्याचा इशारा काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी दिला. सगळ्यांनी ठरवले तर पुण्यात नांदेडची पुनरावृत्ती होऊ शकेल, काही मतभेद असतील तर पक्षांतर्गत बैठकीमध्ये मांडले जावेत, माझे काही चुकले तर मी त्यासाठी माघार घ्यायला तयार आहे. सर्व सहका-यांनी पक्षासाठी एकत्र येऊन योगदान द्यावे, असे आवाहन बागवे यांनी या वेळी केले.प्रदेश समितीवर झालेल्या सदस्यांच्या निवडीवरून पक्षात नाराजी निर्माण झाली होती, त्याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्याचे पडसाद पक्षाच्या शनिवारी झालेल्या साप्ताहिक बैठकीमध्ये उमटले. पदाधिकारी, नगरसेवकांकडून पक्ष कार्यासाठी वेळ दिला जात नसल्याबाबत बागवे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जनमानसात भाजप सरकारची प्रतिमा मलिन झाली असून, काँग्रेस पक्षाने आता एकदिलाने लोकांसमोर गेले पाहिजे, अशी भावना बागवे यांनी व्यक्त केली.रमेश बागवे म्हणाले, की शहर पातळीवर पक्षाचे पावणेचारशे पदाधिकारी आहेत. मात्र, दैनंदिन कामात केवळ १०-२० पदाधिकारी सहभागी होतात. प्रत्येकाने आपले योगदान दिल्यास पक्षाच्या विस्ताराला मदत होईल. शहर काँग्रेस कार्यालयात अनेक मंडळी फिरकतही नाहीत. मग अशांना पदे देऊन उपयोग काय. काहींना बैठकीचे एसएमएस पाठविले, तर म्हणतात आम्हाला फोन आला नाही. फोन केला तरी काही जण बैठकीला येत नाही. पदापेक्षा पक्ष महत्त्वाचा आहे या भावनेने काम करा. राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात वातावरण निर्माण होत आहे.रस्त्यावरची लढाई करण्याची वेळआपण सा-यांनी गट-तट विसरून एकत्र येऊन रस्त्यावरची लढाई करण्याची वेळ आली आहे. केंद्र व राज्य सरकारविरोधातल्या असंतोषाला वाट करून देण्याची जबाबदारी आपण उचलली पाहिजे. सगळ्यांनी ठरवले तर पुण्यात नांदेडची पुनरावृत्ती होऊ शकेल, असे बागवे यांनी स्पष्ट केले.
पुण्यात सर्वांच्या एकजुटीने नांदेडची पुनरावृत्ती करू - रमेश बागवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 3:19 AM