पुणे: मागील लोकसभा निवडणुकीत दुर्लक्षित झालेला सोशल मीडिया हा प्रकार काँग्रेसने यावेळी गंभीरपणे घेतला आहे. पक्षाचे कार्यकर्ते आता भाजपच्या ट्रोलिंगला तोडीस तोड उत्तर देतील, असा विश्वास काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या व सोशल मीडिया विभागाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुप्रिया श्रीनेत यांनी व्यक्त केला.काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र व कोकण विभागाच्या सोशल मीडिया पदाधिकाऱ्यांचे एक दिवसीय सोशल मीडिया सत्याग्रह शिबिर व कार्यशाळेचे उद्घाटन श्रीनेत यांच्या हस्ते गांधी भवन कोथरूड येथे झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
श्रीनेत म्हणाल्या, लोकसभेची आगामी निवडणूक साधीसुधी नसून, देशातील सर्वसामान्य नागरिकांनी इतकी वर्षे टिकवून ठेवलेली लोकशाही वाचवण्यासाठी आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनीही सोशल मीडिया वापरात प्रवीण झालेच पाहिजे. भाजप या माध्यमाचा वापर करून खोटा प्रचार करत असेल तर त्यांना जशास तसे उत्तर द्यायला शिकले पाहिजे.
पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, ठाणे, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यातून सुमारे १५० पेक्षा जास्त कार्यकर्ते शिबिरात सहभागी होते. फेसबुक, चॅटजिटीपी, युट्युब, व्हाॅट्सॲप, आदी विषयांवर विविध तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.