पुणे : कोरोनाबाबत मुंबईत मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक होणार आहे. त्यातील चर्चेनंतर निर्बंध वाढवण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीबाबत जिथे कमी पडलो तिथे माहिती घेतल्यानंतरच अधिक बोलू असे ते यावेळी म्हणाले. वसंतदाद शुगर इन्स्टिट्यूच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर पत्रकारांबरोबर संवाद साधला यावेळी ते बोलत होते.
पवार म्हणाले, निर्बंधाचा निर्णय असा लगेच घेतला जात नाही. त्यावर चर्चा होईल. मंत्री आपली भूमिका स्पष्ट करतील. आरोग्यमंत्री माहिती देतील. त्यानंतर मुख्यमंत्ऱ्यांबरोबर सविस्तर चर्चा होईल. मगच काय तो निर्णय घेतला जाईल. नागरिकांना त्रास होऊ नये याचबरोबर काळजी घेणेही गरजेचे आहे. केंद्र सरकारने निर्णय घेतला, आता काय करायचे ते राज्य सरकार ठरवेल.
आरक्षणाबाबत निर्णय झाल्याशिवाय निवडणूका न घेण्यावर त्यावर आम्ही ठाम
ओबीसा आरक्षणाबाबत कोण काय म्हणते यावर बोलायला मी मोकळा नाही. जो काही निर्णय आहे तो सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. केंद्र सरकार यात मध्यप्रदेशात चांगला वकिल देत असेल व महाराष्ट्राच्या बाबतीत काही वेगळा निर्णय घेत असेल तर काय बोलणार? एक भूमिका नक्की आहे की आरक्षणाबाबत निर्णय झाल्याशिवाय निवडणूका घेऊ नयेत. त्यावर आम्ही ठाम आहोत असे पवार यांनी सांगितले.
राज्यात चौकशी करून लसींचा पुरवठा केला जाईल
लसीकरण व्यवस्थित सुरू आहे. काही ठिकाणी ते कमी पडले असे समजते आहे. त्याची चौकशी करून तिथे पुरवठा केला जात आहे. सर्वांचे लसीकरण व्हावे यादृष्टिने नियोजन करण्यात येत आहे. याचा आढावा संबधित खाते, मंत्री यांच्याकडून वारंवार घेतला जात आहेअसेही ते यावेळी म्हणाले.