पुणे - पुण्यातील कडक निर्बंधांवर निर्णय व्हावा, यासाठी पुणेकर आतुर आहेत. गेल्या महिनाभरापासून निर्बंध शिथील होतील अशी चर्चाच होती. मात्र पुणेकरांना कोणताही दिलासा मिळाला नाही. आज दुपारी ३ वाजता मात्र ही प्रतिक्षा संपू शकते. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली दर आठवड्याला कोरोना आढावा बैठक होते. आज दुपारी ३ वाजता ती बैठक आयोजिली आहे. यावेळी पुण्यातील निर्बंध शिथील होण्यासंबंधी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाऊ शकतो.
सोमवार ते शुक्रवार दुकानं चारपर्यंतच सुरु ठेवण्याची परवानगी सध्या पुण्यात आहे. तर शनिवार, रविवार अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानं बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पण गेल्या आठवडाभरापासून पुण्यातील व्यापारी वर्गाने निर्बंध शिथील होण्याचा मुद्दा ताणून धरलाय. शिवाय, गेल्या आठवड्यात याच बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनीही पुण्यात काही प्रमाणात सूट मिळू शकते, असे सुतोवाच केले होते.
राज्यात कोरोनाची सुरुवात पुण्यातून झाली आणि संपूर्ण जिल्हाच हॉटस्पॉट बनला. त्यानंतर झालेलं लॉकडाऊन, परिस्थिती निवळत असतानाही पाळावे लागलेले कडक निर्बंध यामुळे पुणेकरांनी गेले वर्ष-दिड वर्ष कळ सोसली. मात्र आता पुण्यात निर्बंध शिथील करण्यावरुन वातावरण तापलंय. देशात तसंच महाराष्ट्रात इतर ठिकाणी थोड्या थोडक्या प्रमाणात का होईना पण निर्बंधांमध्ये सूट दिली गेली.
पुण्याच्या बाबतीत पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत फारशी सूट पुणेकरांना उपभोगता आली नाही. ज्यामुळे प्रशासनाला आता पुणेकरांच्या नाराजीचा सामना करावा लागतोय. व्यापारी आंदोलनाने तर पुण्यात सामान्य विरुध्द प्रशासन असा संघर्ष सुरुच आहे. त्यामुळे पुण्यातील निर्बंध शिथील होणार का? या निर्णयाकडे पुणेकरांचे लक्ष लागून राहिले आहे.