पुणे : इंधन दरवाढीनंतर रिक्षा प्रवासाचे दरही वाढवण्यात आले. सदर दरवाढ कमी असल्याची टीका रिक्षा संघटनांनी केल्याने दरवाढीचा पुनर्रविचार करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित संघटनांना दिले आहे.
दरम्यान, रिक्षा पंचायतीच्या शिष्टमंडळाने बुधवारी जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांची भेट घेतली. भाडेवाढीबाबत बी. सी. खटुआ समितीने कोष्टक तयार केले आहे. त्यातील सुत्रानूसार नवीन भाडेवाढ झाली नाही, अशी तक्रार केली. या शिष्टमंडळात संघटनेचे सरचिटणीस नितीन पवार, आनंद बेलमकर, सिद्धार्थ चव्हाण, स्वप्निल फुसे यांचा समावेश होता.
रिक्षाभाडे दरासाठी प्रति किलोमीटर १४ ऐवजी १५ रुपये केले, म्हणजे एक रुपया दरवाढ केली. पहिल्या दीड किलोमीटरसाठी २१ ऐवजी २३ रुपये करत २ रुपये दरवाढ केली आहे. ही भाडे दरवाढ अतिशय तोकडी आहे. त्यातच सीएनजी मिळण्यासाठी रिक्षा चालकांना काही तास रांगेत घालवावे लागतात, अशीही तक्रार करण्यात आली.
सीएनजी पुरवठा कंपनी अधिकाऱ्यांची आज बैठक
जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची दखल घेत सीएनजी पुरवठा कंपनी अधिकाऱ्यांची बैठक गुरुवारी तातडीने बोलवली आहे. दरवाढीचा अभ्यास करून त्याचाही पुनर्रविचार करू, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला दिले.