पिंपरी : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदी संधी मिळावी, यासाठी इच्छुक सदस्यांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. या पंचवार्षिकमध्ये सभापतिपद तिन्ही वेळेस पुरुष सदस्यांनी भूषविले. त्यामुळे यंदा महिला सदस्याला संधी देण्याची दाट शक्यता आहे. पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सभापतींची निवड होणार आहे. महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या असलेल्या स्थायी समितीत सोळा सदस्य आहेत. यामधील कार्यकाल संपलेले आठ सदस्य निवृत्त होऊन त्यांच्या जागी नवीन सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकूण सोळा सदस्यांमध्ये सात महिला, तर नऊ पुरुषांचा समावेश आहे. महापालिका निवडणूक झाल्यानंतर स्थायी समितीचे तीन सभापती झाले. यामध्ये जगदीश शेट्टी, नवनाथ जगताप, महेश लांडगे, अतुल शितोळे यांना सभापतिपदी संधी देण्यात आली. यंदा महिला सदस्याला सभापतिपदाची संधी मिळणार का, याकडे लक्ष लागले आहे. त्यानुसार महिला सदस्यांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे. यामध्ये सविता साळुंखे, अमिना पानसरे, शुभांगी लोंढे यांची नावे चर्चेत आहेत. तर पुरुष सदस्यांनीही सभापतिपदी संधी मिळण्यासाठी ‘फिल्डिंग’ लावली आहे. डब्बू आसवाणी, संजय वाबळे, कैलास थोपटे, नारायण बहिरवाडे यांचीही नावे चर्चेत आहेत. (प्रतिनिधी)पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सभापतिपदाची निवड होत असून, सभापतिपदासाठी इच्छुक असलेल्या राष्ट्रवादी काँगे्रस आणि सहयोगी पक्षाच्या इच्छुक सदस्यांनी बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन, सभागृह नेत्या मंगला कदम यांनी केले आहे.
तिजोरीच्या चाव्या नगरसेविकांकडे येणार?
By admin | Published: February 24, 2016 3:31 AM