पुणे : अमित ठाकरे यांच्याकडे फास्टॅग असूनही टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी अरेरावी केली. त्याची रिॲक्शन आली. त्याच्यावर बोलता तर मग सदोष असणाऱ्या समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात बळी पडलेल्यांची जबाबदारी भाजप किंवा सरकार घेणार का, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. पक्षाच्या बैठकीसाठी ठाकरे बुधवारी पुण्यात आले होते.
अमित ठाकरे यांच्या समर्थकांनी टोलनाक्यावर केलेल्या तोडफोडीसंदर्भात टीका होत आहे. त्यावर बोलताना राज म्हणाले, ‘दिसला टोलनाका की फोड’ असे तो करत नाही. एका टोलनाक्यावर अरेरावी करण्यात आली. त्याचा परिणाम म्हणून तोडफोड झाली. मनसेने राज्यातील अनेक टोल बंद केले. त्यावर कोणी बोलत नाही. मग महाराष्ट्र टोलमुक्त करण्याचे आश्वासन भाजपने दिले होते त्याचे काय झाले?
रस्ते खराब झाले आहेत, खड्डे पडले आहेत. केंद्रात राज्यातील मंत्री असूनही अशी स्थिती आहे. असे होते याचे कारण आपला समाज आहे. त्यांनीच सांगितले की, यांनी ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार केला. मग त्यांनाच सरकारमध्ये कसे घेतले? हे कोणी विचारत नाहीत तोपर्यंत असेच चालणार. राष्ट्रवादीची पहिली टीम गेली असे मी म्हटले होते. आता दुसरी टीमही जाईल. शरद पवार यांचे राजकारण इतकी वर्षे राज्य पाहत आहे, ही मिली भगत आहे.