पुणे : डिसेंबर महिना उजाडला की ‘कानसेनां’ना वेध लागतात ते देशविदेशातील रसिकांच्या पसंतीस उतरलेल्या ‘सवाई गंधर्व भीमसेन’ महोत्सवाचे. भारतीय अभिजात संगीत विश्वात या महोत्सवाने एक मानदंड प्रस्थापित केला आहे. यंदा महोत्सवावर कोरोनाचे सावट असले तरी, सरकारने सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी दिली आहे, मात्र त्यासाठी प्रवेश मर्यादा निश्चित केली आहे. त्यामुळे यंदा महोत्सवाच्या आयोजनाबाबत अनिश्चितता आहे.
मोठा कार्यक्रम करण्यास सरकारने परवानगी द्यावी, अशी आयोजकांची अपेक्षा आहे. परवानगी न मिळाल्यास यंदाचा महोत्सव पुढे ढकलण्याचे संकेत आयोजकांनी दिले आहेत.
दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने ‘सवाई गंधर्व भीमसेन’ संगीत महोत्सवाचे आयोजन केले जाते. सूर, लय, ताल अशा त्रिवेणी संगमातून साकारणाऱ्या या महोत्सवात नव्या-जुन्या पिढीतील दिग्गज कलावंतांचे अविष्कार रसिकांना अनुभवण्यास मिळतात. त्यामुळे या महोत्सवाची रसिक आतुरतेने वाट पाहात असतात.
सरकारने सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी दिल्यानंतर या महोत्सवाबाबत रसिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यंदा महोत्सव होणार की, तो ऑनलाइन होणार, अशी विचारणा रसिकांकडून सुरू झाली. आयोजक मात्र द्विधा अवस्थेत आहेत. महोत्सवाबाबत अद्याप तरी आयोजकांनी कोणतीच ठोस भूमिका जाहीर केलेली नाही.
कोट -
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला देशविदेशासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कानसेन हजेरी लावतात. स्वरमंडपात बसून कलाकारांना ऐकणे ही रसिकांसाठी सुखद अनुभूती असते. ‘ऑनलाइन’मध्ये हा अनुभव शक्य नाही. त्यामुळे महोत्सव ऑनलाइन घेण्याचा विचार नाही.
- श्रीनिवास जोशी, कार्याध्यक्ष, आर्य संगीत प्रसारक मंडळ
-------------------------------------------------