आळंदी (पुणे) : मी ८४ वर्षांचा झालो असलो तरी मी अजून म्हातारा झालो नाही. कारण तुम्ही माझे काय पाहिलं. माझ्या वयाची चिंता कोणी करू नये. त्यामुळे सर्वांनी माझ्या वयावर बोलणं टाळावं. आगामी काळात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात रान पेटवणार असून, राज्यात सत्ता प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.
चऱ्होली खुर्द (ता. खेड) येथे मी सेवेकरी सोशल फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘साहेब केसरी’ बैलगाडा शर्यतीला रविवारी (दि.१७) शरद पवारांनी भेट दिली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी आमदार विलास लांडे, आंबेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देवदत्त निकम, उद्योजक विठ्ठलशेठ मणियार, पै. मंगलदास बांदल, मी सेवेकरी सोशल फाउंडेशनचे संस्थापक सुधीर मुंगसे, खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सोमनाथ मुंगसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हिरामण सातकर, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड. विशाल झरेकर, माजी नगराध्यक्ष विलास कुऱ्हाडे, बबनराव कुऱ्हाडे आदींसह बैलगाडा चालक - मालक शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शरद पवार पुढे बोलताना म्हणाले, बैलगाडा शर्यती घाटात उपस्थित राहून पाहण्याचा पहिल्यांदाच योग आला. मात्र, येथील मुंगसे बंधूंनी भरविलेल्या बैलगाडा शर्यती पाहून अक्षरशः माझ्या डोळ्यांचे पारणे फिटले. शेतकऱ्यांचा हा छंद पिढ्यानपिढ्या जोपासणे गरजेचे आहे. माजी आमदार विलास लांडे म्हणाले, चाकण, रांजणगाव, सणसवाडीत पवार साहेबांनी एमआयडीसी आणली. जिल्ह्यात आयटी पार्क उभारले. जिल्हा विकसित करण्यामागे पवार साहेबांचे मोठे योगदान आहे.
खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, मी शेतकऱ्यांचा बंद झालेला बैलगाड्यांचा हट्ट पूर्ण केला. संसदेत बैलगाडा विषयावर बोलताना विरोधकांकडून थट्टा व्हायची. मात्र, नेते शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनामुळे बैलगाडा शर्यती सुरू करण्यात यश मिळाले. एकीकडे कांदा प्रश्न आहे, दुधाला भाव नाही, शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. मात्र, सरकार फक्त बारी बसवण्याचा प्रयत्न करत आहे. आगामी काळात त्यांची बारी बसणार नाही. युवानेते सुधीर मुंगसे म्हणाले, बैलगाडा सुरू करण्यामागे शरद पवारांचे योगदान आहे. दुष्काळी परिस्थितीत शरद पवारांनी तालुक्यात तीन धरणे बांधली. त्यामुळे तालुक्यातील जमीन सुजलाम सुफलाम झाली. तालुक्यातील जनतेचे खरोखरच आपल्यावर प्रेम आहे. त्यामुळे येत्या काळात ही जनता आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे.
पुणे जिल्ह्यात धरणे बांधली. उद्योगधंदे वाढवले. त्यामुळे शेती संपन्न झाली. जिल्ह्यात सर्वाधिक कांदा पिकतोय. मात्र, सद्य:स्थितीत सरकारने कांदा निर्यात बंदी केली. शेतकरी अडचणीत असतानाही सत्ताधारी शेतकऱ्यांकडे ढुंकूनही पाहत नाही. आगामी काळात नव्याने एकजूट करून ही सत्ता उलटवणे गरजेचे आहे.
- शरद पवार, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस.