Sharad Pawar ( Marathi News ) : विठुनामाचा जयघोष करत संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची पालखी पंढरीकडे निघाली आहे. पंढरपुराकडे जाणाऱ्या या वारीत लाखो वारकरी दरवर्षी सहभागी होत असतात. यंदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेदेखील वारीत सहभागी होणार असल्याचं बोललं जात होतं. तसंच बारामती ते सणसर दरम्यान ज्येष्ठ नेते शरद पवार वारीत चालतील, असे वृत्त समोर आले होते. मात्र याबाबत आता स्वत: पवार यांनी खुलासा केला आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले की, "मी बारामती ते इंदापूरमधल्या सणसरपर्यंत पायी चालणार असल्याची बातमी खोटी आहे. पंढरपूरकडे जाणारी वारी माझ्या गावावरून जाते. तिथं एक दिवस मी थांबणार आहे. पालखीच्या स्वागतासाठी मी तिथे थांबणार आहे. मात्र मी पालखीसोबत चालणार नाही, तर तिच्या स्वागतसाठी तिथे जाणार आहे," असं स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिलं आहे.
माऊली अन् तुकोबांच्या स्वागताला वरूणराजाची हजेरी
संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकोबा यांच्या पालख्या आज पुण्यात दाखल होत असून, तत्पूर्वीच त्यांचे स्वागत वरूणराजाने जलवृष्टीच्या रूपाने केले आहे. भारतीय हवामान विभागानुसार गेल्या आठवड्यात पावसाचा खंड होता. पण जून अखेरीस पुन्हा पावसाला सुरुवात होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. पालखी सोहळा पुण्यात आल्यावर वरूणराजाही बरसणार असे हवामानतज्ज्ञांनी स्पष्ट केले होते. तो अंदाज खरा ठरला आहे.
सकाळपासूनच आकाश भरून आले असून, हलक्या ते मध्यम पावसाला सुरुवात झाली आहे. पालख्यांसमोरील दिंड्या पुण्यनगरीत दाखल झाल्या आहेत. त्यामुळे या पालखी सोहळ्याच्या स्वागताला वरूणराजाने हजेरी लावली आहे. त्यामुळे पुणेकर भक्तीरसात आणि जलरसात न्हाऊन निघत आहेत. पुढील दोन दिवस घाट माथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला असून, पुणे शहरामध्ये देखील ढगाळ वातावरण आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.