गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेनेच्या अनेक आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार स्थापन झालं असलं तरी राज्यातील सत्तासंघर्षावर सोमवारी (२२ ऑगस्ट) रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. राज्याच्या राजकारणात कायमच विचारला जाणारा प्रश्न म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार का? यावर राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे.
“साद घातली तर येऊ देत.. मग बघू,” असं शर्मिला ठाकरे विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाल्या. पुण्यात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. “कोणताही पक्ष संपत नसतो. तुम्ही कोणताही पक्ष पाहा तो पुन्हा लढत असतो. बाळासाहेबांनी शिवसेनेची सुरूवात केली. खालचे जे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत त्यांची बाळासाहेबांवर आजही निष्ठा आहे. मायावती, पासवान यांच्या पक्षांकडे पाहा. मायावती यावेळी लढणार नव्हत्या, पण त्यांच्या मतांचा एक कोटा असतो,” असं त्या यावेळी म्हणाल्या.“केंद्रातील मंत्र्यांना कँटिनमध्ये जे काही मोफत मिळतं ते बंद करा. त्यांना बाहेर विकत घेऊन जेव्हा खायला लागेल तेव्हा किती महागाई वाढली आहे की नाही हे कळेल,” असं विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या.
कोरोना काळात मंत्री लपून बसले होते
“कोरोना काळात आपले सगळे मंत्री लपून बसले होते, फक्त आरोग्यमंत्री टोपे बाहेर दिसायचे. तेव्हा आमच्या पक्षाच्या लोकांनी रस्त्यावर स्टॉल टाकून रेमेडीसिव्हिर इंजेक्शन, बेड मिळवून देणे, पीपीई किट देणे, मृतदेहांची विल्हेवाट लावण्यापासून सगळं केलं. यात आमच्या पक्षातील काही तरुण पोरं गेलीत. त्यामुळे ज्यांना आमचा पक्ष दिसत नाही, त्यावर आम्ही काहीच उपाय करू शकत नाही. तेव्हाही पक्ष होता आणि आताही असल्याचं त्यांनी सांगितलं.