Shivajinagar Vidhan Sabha: शिवाजीनगरला बंडखोरीचा परिणाम होईल का? काँग्रेस अन् भाजपही निवांत, लढत दुरंगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 15:45 IST2024-10-30T15:43:34+5:302024-10-30T15:45:16+5:30
शिवाजीनगर विधानसभा मतदार संघात काँग्रेस आणि भाजप दोघांनाही मताधिक्य असल्याने निर्णय मतदारांवर अवलंबून

Shivajinagar Vidhan Sabha: शिवाजीनगरला बंडखोरीचा परिणाम होईल का? काँग्रेस अन् भाजपही निवांत, लढत दुरंगी
पुणे : विधानसभेच्या रणधुमाळीत अर्ज दाखल करण्याची तारीख कालच संपली. आता प्रचाराच्या दृष्टीने उमेदवार कामाला लागले आहेत. ४ तारखेपर्यंत अर्ज मागे घेण्यासाठी मुदतही देण्यात आली आहे. आता विधानसभा मतदार संघातून मुख्य लढत समोर आल्या आहेत. अशातच पुण्यातील शिवाजीनगर या एकमेव मतदार संघात काँग्रेस आणि भाजप निवांत असल्याचे दिसते आहे. कारण काँग्रेसपुढे बंडखाेरीचे आव्हान असले तरी त्याचा एवढा परिणाम निवडणुकीवर होणार नसल्याची चिन्हे आहे.
या मतदारसंघातही सन २०१९ ला झाली तशीच लढत पुन्हा हाेणार आहे. भाजपचे सिद्धार्थ शिरोळे मागील निवडणुकीत केवळ पाच हजार मतांनी विजयी झाले. त्यावेळचे काँग्रेसचे उमेदवार दत्ता बहिरट यांच्या आग्रही भूमिकेमुळे पक्षाने पुन्हा त्यांच्यावर विश्वास टाकला आहे. दुसरीकडे शिरोळे यांना उमेदवारी मिळू नये म्हणून पक्षातीलच काहीजण साकडे घालून बसले होते, पण शिरोळे यांनी उमेदवारी मिळवलीच. आता साकडे घालणाऱ्यांनाच त्यांच्याबरोबर राहण्याशिवाय गत्यंतर नाही. उमेदवारी अर्ज दाखल करताना ते बरोबर होतेच. शिरोळे यांनीही ‘संपर्क नाही’ हा त्यांच्यावर लागलेले शिक्का मागील सहा महिन्यांत पुसून टाकला असल्याचे दिसते आहे. त्याचा त्यांना उपयोग होईल. काँग्रेसने इथेही बंडखोरी केली आहे. ती करणारे मनीष आनंद कँटोन्मेट मंडळाचे उपाध्यक्ष. शिवाजीनगर मतदारसंघात या भागाचा समावेश आहे, म्हणून त्यांचा उमेदवारीचा आग्रह व नाही मिळाली तर बंडखोरी. त्याचा किती परिणाम होईल याची काँग्रेस कार्यकर्त्यांनाच शंका. त्यामुळे काँग्रेसही निवांत व भाजपही निवांत.
शिवाजीनगर विधानसभा मतदार संघ कोणाचाही बालेकिल्ला मानला जात नाही. याठिकाणी मागील निवडणुकीत निवडून आलेला आमदार अवघ्या ५ हजारांनी जिंकला होता. तर २०१४ लाही भाजपने विजय मिळवला होता. २००८ च्या निवडणुकीत काँग्रेसने प्रचंड मताधिक्याने भाजपला पराभूत केले होते. या मतदारसंघात मतदारांप्रमाणेच उमेदवारही बदलले आहेत. मागील निवडणुका पाहता आगामी विधानसभा दुरंगी लढत होणार असल्याचे समजते आहे.