पिंपरी : औद्योगिक परिसरातील वीजपुरवठ्यासंदर्भात असंख्य तक्रारी आहेत. वारंवार तक्रारी करूनही त्यांची महावितरणतर्फे वेळीच दखल घेतली जात नाही. या संदर्भात चर्चा करून तोडगा काढण्यासाठी महावितरणचे अधिकारी आणि पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात अधिकाऱ्यांनी लघुउद्योजकांच्या समस्या सोडविण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली. जुन्या केबल बदलण्यासाठी २ एप्रिलपासून सर्व्हे करण्यात येणार आहे. एमआयडीसी औद्योगिक परिसरात विजेच्या समस्यांसंदर्भात लोकमतने वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध करून उद्योजकांच्या समस्यांवर प्रकाश टाकला होता. त्याची दखल घेत महावितरणने बैठक घेऊन याविषयावर चर्चा केली. गणेशखिंड, पुणे येथील कार्यालयात नुकत्याच झालेल्या बैठकीस अधीक्षक अभियंता महेंद्र दिवाकर, प्रभाकर धनोकर, भोसरीचे कार्यकारी अभियंता धर्मराज पेठकर, सागर कटके, डी. आर. औंधकर, लघुउद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, उपाध्यक्ष विनोद नाणेकर, संजय जगताप, सचिव जयंत कड, खजिनदार संजय ववले, नगरसेवक सुरेश म्हेत्रे, संचालक संजय सावंत, विनोद मित्तल, नवनाथ वायाळ, हर्षद थोरवे, दीपक फल्ले, प्रमोद राणे, सुनील शिंदे, शांताराम पिसाळ, कैलास भिसे, सल्लागार बशीर तरसगार, चांगदेव कोलते, अनिल कांकरिया, शशिकांत सराफ, सुहास केसकर, रमेश ढाके आदी उपस्थित होते. एमआयडीसी औद्योगिक परिसरातील विज वीतरण यंत्रणा जुनी झाली आहे. कमी क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरवर जादा भार दिल्यामुळे परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होऊन उद्योजकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो. परिसरात जादा क्षमेतेचे ट्रान्सफॉर्मर बसवावेत. डीपी व फिडर बॉक्सची झाकणे चोरीला जात असल्याने लोखंडीऐवजी फायबरची झाकणे बसवावीत. जुने झालेली डीपी व फिडर बदलावेत. परिसरातील ओव्हरहेड वायर वारंवार तुटत असल्याने मोठ्या प्रमाणात स्पार्किंग होते. कमी उंचीच्या वायरमुळे अधिक उंचीच्या मालवाहतूक वाहनांच्या शॉर्क लागून दुर्घटना होण्याची शक्यता आहे. सर्व ओव्हरहेड वायर काढून भूमिगत केबल टाकावी. कुदळवाडी, चिखली, गट क्रमांक ७१० येथे वारंवार वीज जाते. वीज मीटर फॉल्टी असून, नवीन मीटर उपलब्ध नसल्याने अडचण होत आहे, आदी समस्यांचा पाढा लघुउद्योजकांनी मांडला. दिवाकर म्हणाले,‘‘देवी इंद्रायणी फिडर १५ दिवसांत कार्यान्वित केली जाईल. तळवडे, कुदळवाडी परिसरातील वीजविषयक समस्या सोडविण्यासाठी स्वतंत्र बैठक घेण्यात येणार आहे. सेक्टर क्रमांक ७ व १०साठी फिडरची संख्या वाढवून दिली जाईल. वीजतारा, केबल, ट्रान्सफॉर्मर, ट्रान्सफॉर्मरमधील आॅईल चोरी रोखण्यासाठी रात्री गस्त घालण्यासाठी महावितरण व पोलीस यांची बैठक घेऊन, पेट्रोलिंग सुरू केली जाईल, अशी ग्वाही देऊन कोणत्याही प्रकारच्या वीजजोडसाठी कोणालाही पैसे देऊ नये, असे आवाहन दिवाकर यांनी केले. (प्रतिनिधी)महावितरणपेक्षा खासगी वीज कंपनीची वीज ३ रुपयांनी स्वस्त आहे. मध्यम व लघु उद्योजकांना या प्रकारे खासगी कंपन्यांकडून वीज खरेदीची परवानगी द्यावी. यासाठी असलेली १ मेगावॉट विजेची अट रद्द करावी किंवा लघु व मध्यम उद्योगांचा एक समूह (क्लस्टर) करून त्यांना या प्रकारे खासगी कंपन्यांची वीज दिली जावी. त्यामुळे उद्योजकांना स्वस्त दरातील वीज वापरता येईल, अशी मागणी लघुउद्योजक संघटनेने केली. दुसरीकडे महावितरणने दरवाढीचा प्रस्ताव एमइआरसीकडे दिला आहे. तो प्रस्ताव त्वरित मागे घेण्याची आग्रही मागणी संघटनेने केली. एनर्जी बिल कसे वाचावे, याचे पुस्तक उपलब्ध करून दिले जाईल. उद्योजकांच्या माहितीसाठी तक्ता बनवून उद्योजक व इलेक्ट्रिकल निरीक्षकांची एकत्र बैठक घेण्यात येईल. केबल फॉल्ट शोधण्यासाठी २४ तास सेंट गाडी उपलब्ध असून, वाढत्या परिसरामुळे मर्यादा पडतात. शासनाकडे एक जादा गाडीची मागणी केली आहे. तक्रारीच्या एसएमएस संदेशाची दखल घेतली जाईल. जुन्या केबल बदलण्यासाठी २ एप्रिलपासून सर्व्हे करण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांनी दखल न घेतल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.- महेंद्र दिवाकर, अधीक्षक अभियंता
एमआयडीसीतील वीजप्रश्न सोडविणार
By admin | Published: March 28, 2016 3:20 AM