Sharad Pawar: राज्य सरकारही पेट्रोल - डिझेलच्या किंमतीत दिलासा देणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2021 12:40 PM2021-11-05T12:40:04+5:302021-11-05T12:40:32+5:30
दिवाळीची भेट म्हणून पंतप्रधान मोदींनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीचे दर कमी केले आहेत
बारामती/पुणे : केंद्राने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर देशातील जनतेला दिलासा दिला आहे. दिवाळीची भेट म्हणून पंतप्रधान मोदींनी पेट्रोल आणि डिझेल किंमतीच्या दरात कपात केली आहे. पेट्रोल पाच आणि डिझेल दहा रुपयांनी स्वस्त करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्रातही यांचे दर कमी होणार का? यावर जनतेचे लक्ष लागून आहे. त्यातच राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार यांनी पेट्रोल आणि डिझेलवर भाष्य केले आहे. याबाबत आम्ही राज्य सरकारसोबत बोलत असल्याचे पवार म्हणाले आहेत. बारामतीत स्नेहमेळाव्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
पवार म्हणाले, पेट्रोल डिझेलच्या दराबाबत नागरिकांना दिलासा मिळण्यासाठी आम्ही राज्य सरकार सोबत बोलत आहोत. सरकारला याबाबत मार्ग काढण्यास निश्चितच सुचवलेलं आहे. परंतु केंद्र सरकारने राज्याचे जीएसटीची जे देणं लवकर द्यावं. ते दिल्यानंतर लोकांना मदत करण्याचा निर्णय घेणे शक्य होईल असे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
''सद्यस्थितीत आपण हळूहळू संकटातून बाहेर निघत आहोत. परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर नेहमीचा कारभार करू. गेल्या दोन वर्षात जे आर्थिक नुकसान झालं ते भरून काढू, अर्थव्यवस्था समाजव्यवस्था सावरण्याची काळजी घेणार असल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत.''
संपूर्ण खबरदारी घेऊन शुभेच्छा देण्या घेण्याचा कार्यक्रम पार
''महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट आले. त्यामुळे आपल्याला काही पथ्य पाळावी लागली. आता हे संकट हळूहळू कमी होत आहे. महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाला तर राज्य सरकारने अनेक दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेतले. त्याचा परिणाम होऊन कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत लोकांना भेटावं की नाही भेटावं या विचारात आम्ही होतो. पण लोकांच्या आग्रहामुळे आम्हाला हा कार्यक्रम घ्यावा लागला. कोरोनाबद्दलची संपूर्ण खबरदारी घेऊन शुभेच्छा देण्या घेण्याचा कार्यक्रम पार पडतोय.''