पुणे : अल्पवयीन मुलीवर १३ आरोपींनी केलेल्या अत्याचाराची घटना निषेधार्ह आहेच. त्याचबरोबर शहरात सर्व प्रकारच्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व उपाय योजना केली जाणार आहे. नियमांची योग्य अंमलबजावणी न करणाऱ्या निवासी हॉटेल, लॉजेसवर पोलिसांचा वॉच असणार आहे. नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिला.
मित्राला भेटण्यासाठी बिहारला निघालेल्या १४ वर्षाच्या मुलीचे मदतीच्या बहाण्याने रिक्षातून अपहरण करत तिच्यावर १३ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार सोमवारी उघड झाला आहे. त्या मुलीचे पुणे रेल्वे स्टेशनमधून अपहरण करण्यात आले होते. त्यामुळे या घटनेच्या निमित्ताने शहरातील प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पुणे आणि शिवाजीनगर रेल्वे स्टेशन तसेच वाकडेवाडी, स्वारगेट आणि पुणे स्टेशन येथील एसटी स्थानकातून दररोज हजारो प्रवाशांची ये-जा होत असते. त्यातील अनेक प्रवासी पुढे रिक्षा, पीएमपी आणि कॅबद्वारे प्रवास करतात. या प्रवासादरम्यान प्रवाशांची सुरक्षा वाढावी तसेच अत्याचार करणार्या प्रवृत्तीला आळ बसावा यासाठी पोलिस आराखडा तयार करीत आहेत. अत्याचार होण्याची शक्यता असलेले ठिकाणे त्या माध्यमातून शोधली जाणार असून तेथे आवश्यक ते खबरदारीचे उपाय राबविले जाणार आहे, असे गुप्ता यांनी सांगितले.
विशेष पीपींच्या नियुक्ती करण्याची मागणी वानवडी पोलिस ठाण्यात दाखल असलेले सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात सरकारची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील (पीपी) नियुक्ती करण्यासाठी राज्य शासनाशी पत्रव्यवहार केला जाणार आहे. पोक्सो कायद्यानुसार आरोपींवर वेळेत दोषारोपपत्र दाखल केले जाणार असून खटल्याची सुनावणी वेळेत सुरू होईल, असे गुप्ता यांनी सांगितले