... तर पिंपरी महापालिकेतील ‘अनाजीपंतांना’ हत्तीच्या पायाखाली देऊ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2019 11:06 AM2019-08-02T11:06:41+5:302019-08-02T11:20:29+5:30
शिरूरचे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर खासदार कोल्हे यांनी महापालिकेच्या राजकारणात लक्ष घातले आहे. कोल्हे यांनी महापालिकेत आढावा बैठक घेतली.
पिंपरी : महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या भ्रष्टाचार करणाऱ्यांवर शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शरसंधान साधले. ‘‘शंभूराजांनी स्वराज्यद्रोह करणाऱ्या अनाजीपंतांना हत्तीच्या पायाखाली दिले होते. पालिकेतील भ्रष्टाचार करणाऱ्या व चुकीचे काम करणारे सिद्ध झाल्यास, वेळ पडल्यास त्यांनाही हत्तीच्या पायाखाली द्यायला हवे, असा गर्भित इशारा कोल्हे यांनी दिला आहे.
शिरूरचे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर खासदार कोल्हे यांनी महापालिकेच्या राजकारणात लक्ष घातले आहे. कोल्हे यांनी महापालिकेत आढावा बैठक घेतली. बैठकीची वेळ ही चारची होती. सुमारे दीड तास उशिराने खासदार महापालिकेत आले. या वेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते नाना काटे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, माजी महापौर मंगला कदम आदी उपस्थित होते. अभिनेते आणि नेते डॉ. कोल्हे हे महापालिकेत येत असल्याने चाहत्यांनी महापालिका भवनातील तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर गर्दी केली होती. तासाभराच्या बैठकीत कचराप्रश्न, रेडझोनमधील नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधा, स्मार्ट सिटीतील कामे, प्राधिकरण बांधकाम नियमितीकरण, एचए कंपनी खासगीकरण, वेस्ट टू एनर्जी प्रकल्प याविषयी चर्चा केली. तसेच केंद्राच्या योजनांसाठी काही मदत लागल्यास मला सांगा, असे आवाहनही आयुक्तांना केले. महापालिकेत भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचा आरोप होत आहे. महापालिकेतील या अनाजीपंतांचे आपण काय करणार? या प्रश्नावर डॉ. कोल्हे स्मितहास्य करून म्हणाले, ‘‘शंभूराजांनी स्वराज्यद्रोह करणाऱ्या अनाजीपंतांना हत्तीच्या पायाखाली दिले होते. चुकीची कामे आणि भ्रष्टाचार करणारे सिद्ध झाल्यास त्यांनाही हत्तीच्या पायाखाली देऊ.’’