पुणे: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे जीव गमावणाऱ्या तनिषा भिसे या गर्भवतीला न्याय मिळणार का? या विषयी साशंकता निर्माण झाली आहे. हे गंभीर प्रकरण घडून १५ दिवस उलटून गेले आहेत. चौकशांसाठी चार समित्या नेमल्या गेल्या, त्यांचे अहवालही सादर झाले, मात्र अद्याप कोणत्याही ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचण्यात चौकशी समित्या, शासन, पोलिस प्रशासन या सर्व यंत्रणांना अपयश आले आहे. चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या प्रकरणाच्या मुळाशी पोहोचण्यात शासन आणि पोलिस यंत्रणा संभ्रमात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाई होणार की नाही, याबाबतचा निर्णय कोण घेणार? याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. भिसे कुटुंबीयांना पाठीशी असल्याचे आश्वासित करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत नेमका काय निर्णय घेणार? याबाबतच्या चर्चेला उधाण आले आहे.
आरोग्य विभागाच्या चौकशी समितीचा निष्कर्ष
आरोग्य उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक आरोग्य विभागाच्या चौकशी समितीने पहिला अहवाल सादर केला. यामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेला साडेपाच तास उपचारांविना ठेवण्यात आले, ही रुग्णालय प्रशासनाची चूक आहे. असा निष्कर्ष काढण्यात आला. या समितीने ६ एप्रिल रोजी राज्य महिला आयोगाला अहवाल सादर केला आहे.
धर्मादाय आयुक्त कार्यालय चौकशी अहवाल
दीनानाथ मंगेशकर हे धर्मादाय रुग्णालय असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेऊन या सर्व घटनेची चौकशी करण्यासाठी पुणे धर्मादाय सहआयुक्त डॉ. रजनी क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली ४ एप्रिल रोजी चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते. या समितीने ८ एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांकडे चौकशी अहवाल सुपुर्द केला. या अहवालामध्ये तातडीच्या वेळी रुग्णाकडे अनामत रकमेची मागणी केली व प्राथिमक उपचार दिले नाहीत म्हणून डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर ठपका ठेवण्यात आल्याचे आणि रुग्णालयानेही धर्मादाय कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी दीनानाथ रुग्णालय प्रशासनालाही जबाबदार धरले गेल्याचे सांगण्यात येत आहे.
मातामृत्यू अन्वेषण समितीचा निष्कर्ष
पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुख डॉ. निना बोराडे यांच्या अध्यक्षतेखाली मातामृत्यू अन्वेषण समितीनेही या प्रकरणाचा अहवाल सादर केला आहे. यामध्ये महिलेला अतिरक्तस्राव झाल्यामुळे मृत्यू झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. समितीचे काम हे मातामृत्यूचे विश्लेषण करणे असून, कोणालाही दोषी ठरवण्याचे नाही असे समितीतील सदस्यांनी सांगितले.
ससूनच्या वैद्यकीय तज्ज्ञांचा पोकळ अहवाल
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून वैद्यकीय हलगर्जीपणा (मेडिकल निग्लिजन्स) झाला आहे की नाही, याबाबत चौकशी करण्यासाठी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांच्या अध्यक्षतेखाली ससूनच्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीकडे सर्व कागदपत्रे सुपूर्द करण्यात आली होती. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय, सूर्या हॉस्पिटल, मणिपाल हॉस्पिटल, इंदिरा आयव्हीएफ सेंटरमधील रुग्णांची कागदपत्रे, रुग्णाची वैद्यकीय पार्श्वभूमी, डॉक्टरांचे, रुग्णालय प्रशासनाचे आणि कुटुंबीयांचे जबाब आदी सर्व बाबींची ससूनच्या समितीकडून तपासणी करण्यात आली. त्यानुसार अहवाल वैद्यकीय शिक्षण विभाग आणि पोलिस प्रशासनाला पाठवण्यात आला आहे. मात्र, अहवालामध्ये रुग्णालय किंवा डॉक्टरांचा दोष असल्याचा कोणताच स्पष्ट उल्लेख केला नसल्याचे पोलिस प्रशासनाने ससूनच्या समितीकडे काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने सविस्तर अहवाल सादर केला आहे. या अहवालात चौकशी समितीने रुग्णालयावर ठेवलेला ठपका व उपचारात झालेली दिरंगाई या नुसार रुग्णालयावर कारवाई होऊ शकते. मात्र इतर तीन चौकशी समित्यांचे अहवालही अभ्यासले जातील. ससून रुग्णालयाच्या चौथ्या अहवालात पुणे पोलिसांना नेमके कोणते प्रश्न उपस्थित झाले आहेत, या बाबत पुणे पोलिस आयुक्तांकडून माहिती घेणार आहे. - प्रकाश आबिटकर, आरोग्य मंत्री, महाराष्ट्र राज्य