थोरले पवार जिंकणार की धाकटे पवार बाजी मारणार? लोकसभेचा निकाल २४ तासांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 10:46 AM2024-06-03T10:46:47+5:302024-06-03T10:49:47+5:30

निकाल अवघ्या २४ तासांवर आला असताना रविवारी (दि. २) सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दाैऱ्यावर पोहोचले....

Will the elder Pawar win or the younger Pawar win? Lok Sabha result in 24 hours | थोरले पवार जिंकणार की धाकटे पवार बाजी मारणार? लोकसभेचा निकाल २४ तासांवर

थोरले पवार जिंकणार की धाकटे पवार बाजी मारणार? लोकसभेचा निकाल २४ तासांवर

- प्रशांत ननवरे

बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघाचा निकाल २४ तासांवर येऊन ठेपला आहे. अपेक्षित निकालासाठी सर्वच पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी देव पाण्यात घातले आहेत. बारामतीकर देखील चातकाप्रमाणे निकालाची वाट पाहत आहेत. या निकालात ‘पवार’च जिंकणार असल्याचे स्पष्ट आहे; पण थोरले पवार की धाकटे पवार बाजी मारणार, याकडे लक्ष लागले आहे. निकाल अवघ्या २४ तासांवर आला असताना रविवारी (दि. २) सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दाैऱ्यावर पोहोचले.

यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांचा चेहरा निर्विकार होता. पवार यांनी भल्या सकाळीच अजितदादांकडून विकासकामांची पाहणी केली. त्यानंतर ते जनता दरबारात व्यस्त झाले.

शनिवारी (दि. १) सायंकाळी राज्यातील लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचे एक्झिट पोल प्रसिद्ध झाले. यामध्ये काहींनी बारामती लोकसभा निवडणुकीचे अनुकूल, तर काहींनी प्रतिकूल पोल प्रसिद्ध केले आहेत. मात्र, याकडे अधिक लक्ष न देता, चर्चा न करता आज सकाळी ६ वाजता अजितदादांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. शहर आणि परिसरातील विविध विकासकामांची पाहणी करून संबंधितांना सूचना केल्या. कामाचा दर्जा राखण्याबरोबरच ही सर्व कामे दीर्घकाळ टिकावीत, यावर विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या. यावेळी अजितदादांच्या भेटीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती. भेटीस आलेल्या नागरिकांमध्येदेखील आपसात केवळ निवडणुकीच्या निकालाचीच चर्चा होती. मात्र, पवार हे निर्विकार होते. त्यांनी निकालावर कोणतेही भाष्य न करता केवळ नागरिकांच्या अडचणींवर तत्काळ निपटारा करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, बारामतीत राजकीय पक्ष आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये शांततेचे वातावरण आहे. निवडणुकीच्या निकालापूर्वीच्या म्हणजेच वादळापूर्वीची ही शांतता मानली जाते. बारामतीत मंगळवारपासून नव्या राजकीय पर्वाला सुरुवात होत आहे. या पर्वाचा सर्वेसर्वा कोण असणार, याबाबत अजूनही पैजा लावल्या जात आहेत. लोकसभेपासून सुरू झालेला हा राजकीय तणाव बारामतीकर इथून पुढे प्रत्येक निवडणुकीत अनुभवणार आहेत. यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. नव्याने जुळलेली राजकीय समीकरणे निभावताना सर्वच पक्षांच्या प्रमुखांचा आता कस लागणार आहे. बारामतीकरांनी नव्याने निर्माण झालेली राजकीय गणितांमध्ये केलेली बेरीज-वजाबाकीदेखील ४ जूनला स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आता सर्वांनाच निवडणुकीच्या निकालाची प्रतीक्षा आहे.

नेत्यांपेक्षा कार्यकर्त्यांनाच निकालाची घाई

बारामती लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच कार्यकर्त्यांनी आपल्या उमेदवारांच्या विजयाचा जल्लोष करण्याची तयारी केली आहे. गुलाल आमचाच, असा दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना विश्वास आहे. त्यामुळे इंदापूर शहरात खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्या अभिनंदनाचे फ्लेक्स लागले आहेत. नेत्यांपेक्षा कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या निकालाची घाई झाल्याचे यावरून दिसून येते.

Web Title: Will the elder Pawar win or the younger Pawar win? Lok Sabha result in 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.