पुणे : शाईफेक प्रकरणानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटलांविरुद्ध फेसबुकवर आज पुन्हा शाईची मुक्त उधळण होणार? अशी आक्षेपार्ह पोस्ट केलेल्या आरोपीला न्यायालयाने जामीन मंजूर केला.
विकास लोले (रा. सांगवी) असे जामीन मंजूर केलेल्याचे नाव आहे. कोथरूड पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करीत न्यायालयात हजर केले. आरोपीने समाजामध्ये द्वेष निर्माण करण्याच्या उद्देशाने ही पोस्ट केली आहे. या आरोपीमुळे सामाजिक एकोप्याचा भंग झाला असून, समाजामध्ये मोठ्या प्रमाणात तेढ निर्माण झाली आहे. आरोपी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी आहे. त्यामुळे आरोपीला पाच दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी सरकारी वकिलांनी केली.
आरोपीच्यावतीने वकील हेमंत झंजाड यांनी पोलिस कोठडीच्या मागणीला तीव्र विरोध केला. आरोपीने फेसबुकवरील पोस्टमध्ये कोणाच्याही नावाचा उल्लेख केलेला नाही. आरोपीने कोणत्याही जाती, धर्म अथवा समाजाबद्दल कोणतीही आक्षेपार्ह पोस्ट केलेली नाही. त्यामुळे आरोपीविरुद्ध लावलेली सर्व कलमे ही बेकायदा आहेत. तसेच या प्रकरणी तक्रार राजकीय हेतूने देण्यात आली आहे. तक्रारदार हे भाजपचे पदाधिकारी असून त्यांचा हेतूही तक्रार देण्याच्या मागे स्पष्ट होत आहे, असा युक्तिवाद हेमंत झंजाड यांनी केला. त्यामुळे न्यायालयाने युक्तिवाद मान्य करून आरोपीला पोलिस कोठडी न देता त्याची जामिनावर मुक्तता केली. हेमंत झंजाड यांना वकील राहुल खरे, ऋषिकेश मेंगडे, साईराज शिरसाट यांनी सहकार्य केले.