पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तुमचे भोंगे काढा नाही तर आम्हीही लावू असे आंदोलन जाहीर केल्यापासून वेगवेगळे राजकीय पक्ष तसेच संस्था, संघटनांकडून त्यांना समाजमाध्यमांवर ट्रोल केले जात आहे. यांची मुले स्टडीत आणि तुमची जातील कस्टडीत यासारखे प्रश्न आंदोलन संयोजकांना विचारा असे आवाहन केले जात आहे.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंगे उतरवण्यासाठी ३ मे ही मुदत दिली आहे. त्याशिवाय त्यांनी अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर देवळांमध्ये महाआरती करण्याचेही जाहीर केले आहे. पुण्यात राज यांनी हनुमान जयंतीला खालकर मारूती चौकात केलेली महाआरतीही प्रसिद्ध झाली आहे. त्यावरूनच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे राजकीय पक्ष तसेच अन्य काही सामाजिक संस्था संघटनांनी समाजमाध्यमांचा वापर करत या आंदोलनासंदर्भात काही प्रश्न उपस्थित करण्यास सुरूवात केली आहे. जाहीर कार्यक्रमांमधील भाषणातही भोंगा आंदोलनाचा संदर्भ देत बोलले जात आहे.
त्यात प्रामुख्याने तूमचा मुलगा आंदोलनात भाग घेणार आहे का, मग हे प्रश्न आंदोलन संयोजकांना जरूर विचारा असे आवाहन थेट आईवडिलांनाच करण्यात आले आहे. पोलिसांनी अटक केल्यावर जामिनासाठी काय सोय केली आहे. कोर्टात वकीलाचा खर्च कोण करणार? त्याची तरतूद केली आहे का? अटक झाल्याने जर मुलांच्या नोकर्या गेल्या तर? अटकेच्या काळात घरच्या लोकांना आर्थिक मदत देणार का? संयोजक आंदोलनातील मुलांना भविष्यात पासपोर्ट व नोकरीसाठी पोलिसांकडून चारित्ऱ्यप्रमाणपत्र मिळवून देणार का? अशा प्रश्नांचा यात समावेश आहे. याशिवाय पक्षाध्यक्ष, त्यांचे कुटुंबीयही या आंदोलनात रस्त्यावर उतरणार आहेत का असाही प्रश्न समाजमाध्यमांवर विचारला जात आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील एका कार्यक्रमात बोलताना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी सध्या सर्वत्र भोग्यांचे राजकारण सुरू असले तरी तुमचाआमचा भोंगा हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गावर चालणारा सत्याचा भोंगा आहे असे वक्तव्य केले. फेसबूक तसेच व्हाटस ॲपवर पोस्ट तसेच व्यंगचित्रांच्या माध्यमातून मनसेच्या या आंदोलनाला सध्या ट्रोल केले जात आहे. मनसेकडून अद्याप कुठेही याला प्रत्यूत्तर दिलेले दिसत नाही.