पुणे: शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पात सध्या केवळ साडेचार टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला असून गेल्या वर्षाच्या तुलनेत हा साठा साडेतीन टक्क्यांनी जास्त आहे. हा जलसाठा येत्या १० ऑगस्टपर्यंत पुरेल. तोपर्यंत पाऊस नक्कीच पडेल, अशी अपेक्षा जलसंपदा विभागाला आहे.
दुसरीकडे जिल्ह्यातील ३१ धरणांपैकी बहुतांश धरणांमधील पाणीसाठ्याने तळ गाठल्याचे जलसंपदा विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. मॉन्सूनच्या आगमनाची अद्यापही चाहुल न लागल्याने येत्या काही आठवड्यांत शहरासह जिल्ह्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची भीती आहे. जून महिन्याचे तीन आठवडे उलटले तरी जिल्ह्यात मॉन्सूनची प्रतीक्षा कायम आहे. खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांतून पुणे शहराला पिण्यासाठी; तसेच ग्रामीण भागाला शेतीसाठी पाणीपुरवठा करण्यात येतो. या चारही धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे.
खडकवासला प्रकल्पात ४.५५ टीएमसी पाणी
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत सोमवारी (दि. १९) ४.५५ टीएमसी (१५.६२ टक्के) पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. खडकवासला धरणामध्ये ०.८६ टीएमसी, पानशेतमध्ये १.३४ टीएमसी, वरसगाव धरणामध्ये २.२४ टीएमसी आणि टेमघरमध्ये ०.१२ टीएमसी पाणी शिल्लक असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. गेल्या वर्षी हाच एकत्रित साठा ३.४९ टीएमसी अर्थात ११.९६ टक्के इतका होता. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत हा साठा साडेतीन टक्क्यांनी (१.०६ टीएमसी) जास्त आहे.
जिल्ह्यातील धरणांतील साठा घटला
पुणे जिल्ह्यात ३१ धरणे असून, बहुतांश धरणांनी तळ गाठल्याचे चित्र आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत पाऊस न पडल्यास शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. नीरा उजवा कालव्यातून सोडण्यात आलेले पाणी बंद करण्यात आले आहे. नीरा डाव्या कालव्यातून २१ जूनपर्यंत शेतीसाठी पाणी सोडण्यात येणार आहे. त्यानंतर शिल्लक पाणी पिण्यासाठी वापरले जाईल. जिल्ह्यातील सर्व धरणांमधील पाण्याचे १५ जुलैपर्यंत नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार शिल्लक पाणीसाठ्याचे नियोजन केले जाईल, असेही जलसंपदा विभागाने सांगितले. नीरा खोऱ्यात ३.६७ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून ही टक्केवारी ७.५९ इतकी आहे. तर कुककडी खोऱ्यात २.२६ टीएमसी (६.४३ टक्के) तर भीमा उपखोऱ्यात १६.७१ टीएमसी (८.४२ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे.
पूर्वीच्या सुचनांनुसार शहरात एक दिवस पाणीकपात सुरू
खडकवासला प्रकल्पात सध्या ४.५५ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. बाष्पीभवन व अन्य घटक लक्षात घेता हा साठा शहर व ग्रामीण भागाला पिण्याच्या पाण्यासाठी १० ऑगस्टपर्यंत पुरेल. तोपर्यंत धरणक्षेत्रांत पाऊस नक्कीच पडेल अशी आशा आहे. पाणीकपातीबाबत महापालिकेला नव्याने सूचना दिलेल्या नाहीत. पूर्वीच्या सुचनांनुसार शहरात एक दिवस पाणीकपात सुरू आहे. पावसाच्या आगमनानुसार त्यात बदल करण्यात येईल. - विजय पाटील, कार्यकारी अभियंता, खडकवासला प्रक्लप
धरण उपयुक्त साठा टीएमसी टक्के
खडकवासला - ०.८६ ४३.३४पानशेत - १.३४ १२.५९वरसगाव - २.२४ १७.४६टेमघर - ०.१२ ३.२०पवना - १.७६ २०.६४भामाआसखेड - १.९५ २५.४७