पुणे : शहरातील रस्त्यांची अवस्था सुधारण्यासाठी महापालिका त्यावर ३०० कोटी रुपये खर्च करत आहे. आता तरी रस्त्यांवरचे खड्डे बुजतील का? असा प्रश्न त्यातून निर्माण झाला आहे. तब्बल १०० किलोमीटर अंतराचे रस्ते यात सुधारण्यात येणार आहेत.
महापालिकेने शहरातील रस्त्यांची दुरवस्था दूर करण्यासाठी म्हणून महापालिकेने खासगी संस्थेला अहवाल देण्याचे काम दिले होते. त्यांच्या अहवालानुसार महापालिकेने शहराच्या वेगवेगळ्या भागातील सुमारे १०० किलोमीटर अंतराचे रस्ते निश्चित केले. त्याचे ६ विभाग केले. प्रत्येक विभागाच्या स्वतंत्र निविदा काढल्या. त्यात काँक्रिटचे रस्ते ९ किलोमीटर, तर डांबरी रस्ते ९१ किलोमीटरचे आहेत.
या विभागाचे अधीक्षक साहेबराव दांडगे यांनी सांगितले की, एखाद्या रस्त्याचे सलग डांबरीकरण न करता जिथे दुरुस्तीची गरज आहे तिथेच हे काम केले जाईल. काम झाल्यानंतर या रस्त्यावर कोणत्याही प्रकारच्या खोदाईला सक्त मनाई करण्यात येणार आहे. शहरातील रस्त्यांची एका स्वतंत्र पथकामार्फत पाहणी करण्यात येत असून, जिथे खड्डे पडले असतील तिथेही त्वरित काम सुरू करण्यात येणार असल्याचीही माहिती दांडगे यांनी दिली.