पुणे : कल्याणीनगर येथे १९ मे रोजी घडलेल्या अपघात प्रकरणानंतर खडबडून जागे झालेल्या पोलिस यंत्रणेने दोषींना गजाआड करण्यासाठी धडक कारवाई केली. मात्र, या अपघाताव्यतिरिक्त महिनाभरात शहरात ‘हिट अँड रन’च्या असंख्या घटना घडल्या असून, त्यामध्ये ११ अपघात प्राणांतिक आहेत. त्यापैकी अपघाताला कारणीभूत असलेल्या केवळ चार वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहेत. तर, उर्वरित सात जणांची अद्यापही पोलिस दफ्तरी ‘अज्ञात’ अशीच नोंद आहे. त्यामुळे हे अज्ञात वाहनचालक कधी सापडतील, असा सवाल पुणेकर विचारत आहेत.
पुण्यासह देशभरात कल्याणीनगर अपघात प्रकरण गाजले. भरधाव आलिशान कारच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. संबंधित अल्पवयीन मुलाने मद्यप्राशन केल्याचे समोर आले. या प्रकरणात पोलिसांनी संबंधित मुलावर गुन्हा दाखल केला. त्याला दारू विक्री करणाऱ्या पबच्या चालक-मालकांवर गुन्हा दाखल केला. तसेच, मुलगा अल्पवयीन असतानाही त्याला गाडी देणाऱ्या त्याच्या वडिलांवरही गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य ओळखून पुणे पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे कौतुक झाले. मात्र, शहरात दररोज प्राणांतिक अपघात होत आहेत. त्यातही अपघाताची खबर न देता, जखमींना मदत न करता रस्त्यावर मरणासन्न अवस्थेत सोडून जाणाऱ्या वाहनचालकांना पोलिस अद्दल केव्हा घडवणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.