Ajit Pawar: राज्यातील नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे शंभर टक्के क्षमतेने सुरू होणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 16:16 IST2021-10-22T16:16:34+5:302021-10-22T16:16:45+5:30
राज्यातील नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे शंभर टक्के क्षमतेने सुरू करण्याची मागणी होत आहे, दिवाळीच्या नंतर परिस्थिती अशीच राहिली आणि आणखी चांगली झाली तर संपूर्ण क्षमतेने नाट्यगृहे आणि चित्रपटगृहांना आम्ही परवानगी देणार आहोत

Ajit Pawar: राज्यातील नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे शंभर टक्के क्षमतेने सुरू होणार?
पुणे : ''राज्यातील नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे शंभर टक्के क्षमतेने सुरू करण्याची मागणी होत आहे, दिवाळीच्या नंतर परिस्थिती अशीच राहिली आणि आणखी चांगली झाली तर संपूर्ण क्षमतेने नाट्यगृहे आणि चित्रपटगृहांना आम्ही परवानगी देणार आहोत, अशा शब्दांत त्यांनी चित्रपटगृह चालकांना दिलासा दिला. राज्यासह पुण्यातील नाट्यगृह शुक्रवारपासून रसिकांसाठी खुली झाली. बालगंधर्व रंगमंदिर येथे अजित पवार यांच्या हस्ते ‘तिसरी घंटा’ वाजवून नाट्यगृहाची नांदी झाली. त्यावेळी ते बोलत होते.
''नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सगळ्यांनी चर्चा झाली. एकपडदा चित्रपटगृह चालकांचेही काही प्रश्न आहेत. त्यातही मी लक्ष घातलेले आहे. मुख्यमंत्र्यांनीही आपण त्यातून मार्ग काढून देऊ असा सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आपली जी नाटकांची परंपरा आहे ती पुण्यात किंवा संपूर्ण महाराष्ट्रात असेल या सगळ्या गोष्टींना अधिक गतिमान करण्याचा प्रयत्न करू असेही ते यावेळी म्हणाले आहेत.''
बालगंधर्व रंगमंदिर पुनर्विकासाचा प्लँन मी बघतो...तुम्ही पण पाहा
''बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास करायचा म्हटले तर त्यामध्ये दोन मतप्रवाह आहेत. कुठलाही निर्णय घेत असताना तो शंभर टक्के सगळ्यांना आवडेल असा दावा कदापि करणार नाही. आधीच १७ महिने नाटयगृह बंद होती. त्यात आता बालगंधर्व रंगमंदिर नूतनीकरणासाठी पाडले किंवा बंद ठेवावे लागले आणि पुन्हा दुसरे कुठले कामच करता आले नाही तर कलाकार अडचणीत सापडतील. रंगमंदिराची प्रचंड मोठी जागा आहे, त्यांचा प्लॅन मी पण पाहतो. तुम्ही पण बघा....असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कलाकारांसह पुणेकरांना दिला. सभागृहे किंवा नाट्यगृहांचे बांधकाम करताना कलाकारांचा विचार व्हायला हवा. मी महापौर मुरलीधर मोहोळ आणि आयुक्तांना तशा सूचना देईन असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.''