महापालिकेत पुणे पॅर्टनची पुनरावृत्ती हाेणार का? अजित पवार यांच्या बंडखाेरीनंतर चर्चेला उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2023 12:43 PM2023-07-03T12:43:38+5:302023-07-03T12:45:28+5:30
हा पुणे पॅर्टन पुन्हा आगामी महापालिकेत होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे...
पुणे : कॉंग्रेसचे नेते सुरेश कलमाडी यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी २००७ मध्ये पुणे महापालिकेत भाजप आणि शिवसेनेला बरोबर घेऊन सत्ता आणली होती. हा पुणे पॅर्टन राज्यात गाजला होता. आता राज्यातील सरकारमध्ये शिवसेना, भाजप बरोबर राष्ट्रवादी काॅंग्रेस सहभागी झाली आहे. त्यामुळे आगामी पुणे महापालिकेच्या निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलणार आहेत. हा पुणे पॅर्टन पुन्हा आगामी महापालिकेत होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
कॉग्रेसचे नेते सुरेश कलमाडी आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यातून त्याकाळी विस्तव ही जात नव्हता. त्यामुळे कलमाडी यांना सत्तेपासून रोखण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मोठी खेळी खेळत भाजपचे नेते विनोद तावडे आणि शिवसेनेचे तेव्हाचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख अरविंद सावंत यांना विश्वासात घेतले. पुणे महापालिकेत कॉंग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, भाजपला बरोबर घेऊन पुणे पॅर्टन तयार केला.
राष्ट्रवादीच्या राजलक्ष्मी भोसले पुण्याचा महापौर झाल्या. शिवसेनेला उपमहापौर पद आणि स्थायी समितीचे अध्यक्षपद दिले. भाजपला स्थायी समितीचे अध्यक्षपद दिले. त्यावेळी राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात हा पुणे पॅर्टन मोठा गाजला. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पुणे पॅर्टन तोडण्यात आला. त्यानंतर पुणे महापालिकेत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आली. त्यानंतर २०१२ च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसची सत्ता आली. आघाडीने पाच वर्ष काम केले. २०१७ च्या निवडणुकीत पालिकेत भाजपची एकहाती सत्ता आली. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे अजित पवार आणि भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे शपथविधी केला. पण हे बंड राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोडून काढले.
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तेवर आले. अडीच वर्षानंतर शिवसेनेचे ४० आमदार फुटले. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री बनले. या सरकारला एक वर्ष पूर्ण झाले असतानाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे २९ आमदारांसह शिवसेना आणि भाजप सरकारमध्ये सहभागी झाले. त्यामुळे राज्यात २००७ साली पुणे महापालिकेत असलेल्या पुणे पॅर्टनची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
पुणे महापालिकेत सध्या प्रशासक राज आहे. आगामी निवडणुकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा ठाकरे गट, अशी महाविकास आघाडी म्हणून सामोरे जाणार होते ; पण आता राज्यातही पुणे पॅर्टन तयार झाला आहे. त्यामुळे महापालिका निवडणूक भाजप स्वतंत्र लढविणार का?, शिवसेना आणि राष्ट्रवादीला बरोबर घेऊन पुणे पॅर्टन म्हणून सामोरे जाणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
महाविकास आघाडी विरूद्ध पुणे पॅर्टन?
शिवसेनेमध्ये फुट पडली आहे. त्यामुळे शिवसेेनेचा शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट पडले आहेत. आता राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडली. त्यामुळे एक गट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बरोबर, तर दुसरा गट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बरोबर जाणार आहे. कॉंग्रेस पक्ष, शिवसेनेचा ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार यांच्या बरोबर आहे. त्यामुळे पुणे महापालिकेची आगामी निवडणूक महाविकास आघाडी आणि भाजप, शिवसेनेचा शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गट या पुणे पॅर्टन विरूध्द होण्याची दाट शक्यता आहे.