पुणे : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात दिवसाला मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढत असताना शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. पण आजच सकाळी शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड यांनी दिली. राज्यात २४ जानेवारीपासून 1 ली ते 12 वी पर्यंतच्या शाळा सुरू होतील असे त्यांनी सांगितले आहे. पण पुण्यात कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. आजही ७ हजाराहूनही अधिक कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे पुण्यातील शाळा २४ जानेवारी सोमवारपासून सुरु होणार कि नाही. याबाबत एका प्रसारमाध्यमांशी बोलताना पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
मोहोळ म्हणाले, राज्यात सोमवारपासून शाळा सुरु होत आहेत. पण पुण्यात शाळा सुरु करण्याबाबत अजून ठोस निर्णय झालेला नाही. दिवसेंदिवस पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पालकमंत्री अजित पवार यांच्यासोबत शनिवारी होणाऱ्या कोरोना आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात येईल. अद्याप तरी शहरातील शाळा सुरु करण्याबाबत निर्णय झालेला नाही.
राज्यात सरकारने 15 फेब्रुवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले होते
वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यात सरकारने 15 फेब्रुवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. आता 24 जानेवारीपासून पुन्हा शाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, स्थानिक प्रशासनाला त्याचे अधिकारही देण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याने सोमवारपासून राज्यात पुन्हा शाळेची घंटा वाजणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.
कोरोना रुग्णांची वाढ ही पुणेकरांसाठी चिंतेची बाब
पुण्यात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. दिवसाला २०० - ५०० असे आढळणारे रुग्ण आता हजारांच्या घरात पोहोचले आहेत. गेल्या दोन दिवसापासून हाच आकडा ५ हजारांपेक्षा जास्त आहे. तर आज पुणे शहरातील कोरोना रुग्णसंख्येने दोन वर्षातील आजवरचा उचांक गाठला आहे. गुरुवारी शहरात तब्बल ७ हजार २६४ रुग्ण आढळून आले आहेत. पुणेकरांसाठी हि चिंतेची बाब ठरत आहे.