पुणे : शहराचा पाणीपुरवठा, पाण्याची गळती आणि पाणी उचलण्याच्या आकडेवारीत असलेली तफावत यासह विविध मुद्द्यांवर पुणे महापालिका आणि जलसंपदा विभाग एकत्रित पाहणी करून तोडगा काढणार आहे. दरम्यान, काही गावे व टीपी स्कीमला महापालिका आणि जलसंपदा विभाग या दोघांकडून पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती उघडकीस आली आहे.
पुणे महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यात पाणीपुरवठावरून सातत्याने मतभेद होत असतात. त्यामुळे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांबराेबर चर्चा केली. त्यात सकारात्मक चर्चा होऊन वादाच्या मुद्द्यांवर याेग्य पद्धतीने मार्ग काढला जाणार आहे.
खडकवासला धरणातून महापालिका केवळ दहा एमएलडी एवढेच पाणी उचलते. त्यानुसार, दर आकारणी केली जावी, अशी महापालिकेची भूमिका आहे. दहा एमएलडी पाणी देण्यासाठी अडीचशे एमएलडी एवढे पाणी साेडावे लागते, असा दावा जलसंपदा विभागाने केला आहे. पुणे महापालिका काही गावांना पाणीपुरवठा करते. त्याच वेळी ही गावे कालव्याद्वारे पाणी उचलतात. त्यांना जलसंपदा विभागाकडूनही पाणीपुरवठा केला जाताे. शहरातील काही टीपी स्कीमलाही याच पद्धतीने दाेन्ही संस्थांकडून पाणीपुरवठा केला जाताे. त्यामुळे या संदर्भात प्रत्यक्ष पाहणी करून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.
सद्यस्थिती काय?
- भामा आसखेड या धरणातून पुण्याला पाणी दिले जाऊ लागल्यानंतर, तेवढ्या प्रमाणात खडकवासला धरणातून पाणी कपात केली जाण्याच्या संदर्भात काेणताही लेखी आदेश नसल्याचे या चर्चेत स्पष्ट झाले, तसेच पाणी दरातील वाढ करताना निवासी वापराची ज्या प्रमाणात वाढ झाली, त्याच प्रमाणात औद्याेगिक वापराची वाढ गृहीत धरली गेली आहे.
- वास्तविक पुणे शहरातील औद्यागिक वापर कमी नसून, निवासी क्षेत्रात वाढ झाल्याने पाण्याचा वापर वाढला आहे. ही बाब महापालिकेने जलसंपदा विभागाच्या निदर्शनास आणून दिली. सिंचन क्षेत्र कमी झाल्याने, शेतीसाठी पाण्याची गरज कमी हाेत असून, त्याची आकडेवारी देण्याची तयारी जलसंपदा विभागाने दाखविली आहे.
पाण्याच्या वहनातील गळती शाेधण्यासाठी काेणत्या संस्थेचे नियम, निकष गृहीत धरले जावेत, हे पुढील काळात ठरणार आहे.
- रवींद्र बिनवडे, अतिरिक्त आयुक्त