पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सेवक पतसंस्थेत झालेल्या आर्थिक अनियमिततेची चौकशी झाल्यास काही लाख नाही तर काही कोटींचा हिशोब लागत नसल्याचे समोर येऊ शकते. त्यामुळे सहकार खात्याकडून या प्रकरणाची चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच पतसंस्थेतील रक्कम ही विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांच्या कष्टाची असून कर्मचाऱ्यांकडूनही पतसंस्थेतील कारभाराचा हिशोब मागितला जात आहे.
पुणे विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी जमा केलेल्या रकमेतून पतसंस्थेकडे मोठा निधी उभा राहिला आहे. त्यातूनच कर्मचाऱ्यांना कर्ज उपलब्ध करून दिले आहे. मात्र, काही कर्मचाऱ्यांनी कर्जाचे हप्ते नियमितपणे पतसंस्थेत जमा करून सुध्दा त्याच्या नोंदी पतसंस्थेच्या कार्यालयात नीट ठेवल्या गेल्या नाहीत. त्यामुळे तब्बल ६५ लाखांचा हिशोब लागत नसल्याचे बोलले जात आहे. परंतु, ही रक्कम काही कोटींच्या घरात जाऊ शकते, असे सूत्रांकडून सांगितले जात आहे.
विद्यापीठाच्या संचालक मंडळाने पतसंस्थेच्या व्यवहारात पारदर्शकता ठेवणे अपेक्षित होते. परंतु, लेखा परीक्षकांनी कामकाजाच्या पध्दतीवर शेरे मारले आहेत. तसेच एका संचालकांने राजीनामा देत झालेल्या अनियमिततेची चौकशी व्हावी, असे पत्र विद्यापीठाच्या कुलसचिवांना दिले आहे.त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाकडून याबाबत कार्यवाही केली जाणार असल्याचे दिसून येत आहे.
--
पतसंस्थेचे संचालक संतोष मदने यांचा राजीनामा व तक्रार प्राप्त झाली आहे. सदर प्रकरण जुने आहे.त्यामुळे यासंदर्भातील काही पत्रव्यवहार सहकार खात्याकडे झाला आहे का? याबाबत माहिती घेणे गरजेचे आहे. सध्या पतसंस्थेच्या सचिवांकडून खुलासा मागवला आहे.
- डॉ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ