अनेकांनी कोरोनाच्या भीतीपोटी दिला नकार
अतुल चिंचली
पुणे: दहावी-बारावीची परीक्षा तोंडावर आली असताना अंध विद्यार्थ्यांसाठी मोठी समस्या निर्माण झाली आहे. दरवेळी महाविद्यालय, विविध संस्थांकडून यांना पेपर लिहिण्यासाठी रायटर मिळवून दिले जातात. पण यंदा दोन महिन्यांपासून आतापर्यंत एकही रायटर न मिळाल्याचे दृष्टिहीन विद्यार्थ्यांची कोंडी झाली आहे. अभ्यास करूनही ‘रायटर’विना परीक्षा कशी द्यायची, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.
जानेवारी महिन्यात या दृष्टिहीन विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेचा फॉर्म भरला होता. दरवर्षीप्रमाणे या फॉर्मसोबतच त्यांना रायटर मिळणेबाबतचा फॉर्मही भरून द्यावा लागतो. त्याचप्रमाणे यावर्षी त्यांनी रायटरचाही फॉर्म भरला. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून एकही रायटर उपलब्ध झाला नाही.
पुणे शहरातील विविध शाळा आणि महाविद्यालयांत दहावी-बारावीची दृष्टिहीन मुले शिकत आहेत. त्यांना पेपर लिहिण्यासाठी रायटरबाबत अटी घालून देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी नववीचा विद्यार्थी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अकरावीचा विद्यार्थी रायटर असणे बंधनकारक आहे.
सद्यस्थितीत दृष्टिहीन विद्यार्थ्यांना कोरोनामुळे रायटर मिळत नाहीये.
बीड येथे राहणारा करण अंबाड म्हणाला,
मी पुण्यातील वाडिया महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. दरवर्षी आम्हाला रायटर मिळण्यास अडथळे येत नाहीत. संस्था अथवा महाविद्यालयाच्या मदतीने रायटर मिळून जातात. पण यंदा अनेकांची तयारी नसल्याचे दिसून येत आहे. कोव्हिडमुळे पेपरला तीन तास बसण्याची त्यांची मानसिकता नाही. तसेच त्यांच्या घरातून नकार दिला जात आहे. कॉलेजकडूनही सध्या रायटर शोधण्याचे प्रयत्न चालू आहेत. कोव्हिडमुळे हे कठीण झाले आहे.
......................................
एक दीड महिन्यापासून रायटर शोधत आहे. पण कोणच तयार होत नाहीये. अनेकांनी कोरोनाची कारणे दिली आहेत. आम्ही सध्या आमच्या मूळगावी आलो आहोत. त्यामुळे येथून आम्हाला रायटर शोधण्यासाठी फोनवरच संपर्क साधावा लागत आहे. अशा परिस्थितीत लोकांची रायटर होण्याची मानसिकता नसल्याचे दिसून येत आहे. समाजातून आम्हाला रायटर मिळण्याची अपेक्षा आहे.
ऋषीदास शिंदे, दृष्टिहीन विद्यार्थी
...............
अंध विद्यार्थ्यांसाठी रायटरबाबत हा नेहमीच अनेक प्रश्न उपस्थित होत असतात. त्यातून सर्वत्र कोरोनाची चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. आम्ही अभ्यासावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले आहे. पण गेल्या दोन महिन्यांपासून रायटर मिळत नाहीयेत. त्यामुळे परीक्षा कशी घ्यावी, असा प्रश्न पडला आहे. कोरोनाच्या परिस्थितीत रायटर मिळण्यासाठी आमची धावपळ सुरू आहे.
अथांग भंडारी,
दृष्टिहीन विद्यार्थी