सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा व्यवस्थापन प्रतिनिधी मतदारसंघातून काम करण्याची संधी मला मिळाली आहे. आधुनिक शिक्षण पद्धतीला अनुसरून विद्यापीठ, विद्यार्थी आणि संस्थाचालक यांच्यात समन्वय साधून अभ्यासक्रमांच्या फेररचनेसाठी प्रयत्न करणार आहे. तसेच शिक्षण संस्थाचालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यावरील उपाययोजनांसाठी प्रयत्न करणार आहे. शिक्षक, अध्यापकांना अपग्रेड करण्यासाठी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा व्यवस्थापन प्रतिनिधी व डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे सचिवडॉ. सोमनाथ पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.डॉ. सोमनाथ पाटील म्हणाले, ‘‘ गेल्या काही वर्षांत संस्थात्मक काम करण्याचा माझा अनुभव होता. मात्र, कोणतीही निवडणूक लढण्याचा अनुभव नव्हता. माझी ही पहिलीच निवडणूक होती. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा व्यवस्थापन प्रतिनिधी मतदारसंघ निवडणुकीतून खूप काही शिकायला मिळाले. एखादी लीडरशिप विकसित होत असताना, अधिसभा सदस्य निवडणुकीत कोणते टप्पे असतात, याचा अनुभव मिळाला. व्यक्तिमत्त्व विकास होण्यास याचा फायदा होणार आहे. त्याचबरोबर विविध मान्यवरांशी संवाद झाला. विचारांचे आदानप्रदान झाले. आपली भूमिका काय आहे, हे सांगता आले. संस्था, विद्यार्थ्यांच्या सदस्यांकडून असलेल्या अपेक्षा काय आहेत, हे समजले.’’‘‘भारताचे दिवंगत राष्टÑपती मिसाईल मॅन डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी ‘युवक हीच राष्टÑाची प्रमुख शक्ती आहे आणि त्या माध्यमातून आपण महासत्ता बनू शकतो’ असा आशावाद तरुणाईच्या डोळ्यांत पाहिला. याच उद्देशाने शिक्षणातून समाज घडविण्याचे कार्य केले जात आहे. ‘ज्ञानाच्या माध्यमातून सबलीकरण’ हे ध्येय ठेवून ते साध्य करण्यासाठी यशस्वी वाटचाल सुरू आहे. आमच्या अथक प्रयत्नांमुळे डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ नावाजलेले शैक्षणिक केंद्र म्हणून प्रसिद्ध पावले आहे. गुणात्मक शिक्षणासाठी प्रयत्न केले जात आहेत, असा संस्थात्मक कामाचा मला अनुभव होता.आता पुणे विद्यापीठाच्या अधिसभा व्यवस्थापन प्रतिनिधी निवडणुकीत पहिल्याच फेरीत विजय झाला. विद्यापीठात प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. विविध शैक्षणिक संस्थांत आंतरराष्टÑीय पातळीवर संशोधनाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शिक्षणातील गुणात्मकता वाढीस लागावी यासाठी, तसेच विद्यार्थ्यांना आंतरराष्टÑीय पातळीवर शिक्षण मिळावे, यासाठी भविष्यकाळात विद्यापीठात मोठ्या प्रमाणावर संशोधन कसे होईल, त्यासाठी पूरक वातावरण निर्माण करणे काळाची गरज आहे.आधुनिक शिक्षण पद्धतीला अनुसरून विद्यापीठ, विद्यार्थी आणि संस्थाचालक यांच्यात समन्वय साधून अभ्यासक्रमांच्या फेररचनेसाठी प्रयत्न करणार आहे. दुवा म्हणून काम करायला आवडणार आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थी आणि संस्थांच्या अडचणी समजून घेऊन एकजुटीने अधिसभेच्या माध्यमातून काम करणार आहे, असे पाटील म्हणाले.‘‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे जागतिक स्तरावर नावाजलेले आणि लौकिक असणारे विद्यापीठ आहे. त्या संस्थेच्या समितीवर काम करण्याचे समाधान वेगळेच असणार आहे. प्रत्येक शिक्षण संस्थेत विद्यार्थी आणि शिक्षक हा महत्त्वाचा घटक असतो. शिक्षक, अध्यापकांना अपग्रेड करण्यासाठी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे, त्यातून चांगले अध्यापक तयार झाले की, पर्यायाने चांगले विद्यार्थी घडणार आहेत. विद्यार्थी चांगले घडले, तर चांगली पिढी घडेल आणि राज्याचा, आणि राष्टÑाचा विकास होणार आहे. सर्वांनी मला संधी दिली. त्यामुळे मनापासून काम करण्याची इच्छा आहे. विद्यापीठ परिसरात मैदानांची संख्या चांगली आहे. तिथे नागरिकांसाठी काही आरोग्य विषय अभ्यासक्रम किंवा उपक्रम सुरू करता येतील का, या विषयीही सुचविणार आहे. विद्यार्थिविकासाला प्राधान्य देणार आहे. तसेच विद्यापीठाच्या वार्षिक आर्थिक नियोजनात विद्यार्थी आणि महाविद्यालयांसाठी विशेष काही उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असेही पाटील म्हणाले.
अभ्यासक्रम फेररचनेसाठी प्रयत्न करणार - डॉ. सोमनाथ पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 2:22 AM