पुणे : राज्यासह देश विदेशातील लाखो भक्तांना ओढ लागलेल्या व संपूर्ण राज्याचे लक्ष असलेल्या पुणे जिल्ह्यातील संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे नियोजन कण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील शुक्रवार (दि.28) रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत काय निर्णय होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
कोरोना विषाणूच्या संसर्गाची पार्श्वभूमी लक्षात घेता यंदा आषाढीची पायी वारी आणि नेहमीचे पालखी सोहळे कसे पार पाडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यात संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराममहाराज संस्थानसह राज्यातील प्रमुख संस्थानांनी आषाढी वारीबाबत प्रस्ताव ठेवले आहेत. यावर या वेळी चर्चा होणार आहे. यंदा आषाढी एकादशीचा सोहळा 20 जुलै 2021 रोजी साजरा होत आहे. या सोहळ्यासाठी गतवर्षी राज्यातील संत ज्ञानदेव, संत तुकाराम, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत एकनाथ, संत मुक्ताबाई, संत नामदेव, संत चांगावटेश्वर व माता रुक्मिणी या मानाच्या 9 पालख्यांना एसटी बसने वन डे वारीला शासनाने परवानगी दिली होती.
कोरोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षी एसटी बसने आषाढी यात्रेला पालखी सोहळे आणावे लागल्यानंतर यंदा मात्र पायी पालखी सोहळ्यासाठी वारकरी संप्रदाय आक्रमक झाला आहे. कोरोनाचे निर्बंध चालतील मात्र बंदी नको, अशी भूमिका वारकरी संप्रदायाने घेतली आहे. उद्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देहू, आळंदी आणि इतर मानाच्या सात पालखी सोहळा संस्थांशी चर्चा करणार असून यातून मार्ग निघेल अशी वारकरी संप्रदायाला अपेक्षा आहे.
यंदा 20 जुलै रोजी आषाढी एकादशी असून 1 जुलै रोजी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा तर 2 जुलै रोजी संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे प्रस्थान आहे. मात्र, अजूनही राज्यातील अनेक जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली नसल्याने मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. यात सोलापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यात देखील कोरोनाची साथ असल्याने यंदा आषाढी यात्रा कशी घ्यायची हा पेच सरकारच्या पुढे आहे.-----
सहकार मंत्री बाळासाहेब पाटील उद्या पुणे दौऱ्यावर; पालखी सोहळा नियोजन बैठकीत होणार सहभागी
सहकार, पणन मंत्री बाळासाहेब पाटील शुक्रवारी( दि. २८) पुणे जिल्हा दौऱ्यावर आहेत. दुपारी साडे बारा वाजता ते साखर आयुक्त कार्यालयात येणार आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराज यांच्या आषाढी वारीसंबंधी नियोजन बैठकीत ते सहभागी होणार आहे.