पुणे : थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या मालकीची ९९.२७ एकर जमीन खरेदी करण्याचा प्रस्ताव पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने पणन संचालकांकडे दिला आहे. या जागेची किंमत सुमारे ३३५ कोटी रुपये असून, दोन्ही संस्थांच्या संचालक मंडळाने व शासनाच्या मान्यतेने कमी किमतीने उपबाजार आवारासाठी जमीन खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. मात्र, पुणे बाजार समितीची आर्थिक स्थिती पाहता खरेदीसाठी पैसे उभारण्याची वाट कठीण असल्याचे चित्र आहे.- बाजार समितीसमोर पैसे उभारण्याचे आव्हानगेल्या काही वर्षांपासून यशवंत कारखाना बंद अवस्थेत आहे. बँका व कामगारांची देणी कारखान्याला द्यायची आहेत. कारखाना सुरू करण्यासाठी कोट्यवधीची देणी भागवणे कारखान्यापुढे आव्हान आहे. अशा परिस्थितीत यशवंत कारखान्याच्या संचालक मंडळाने कारखान्याची देणी देणे व भांडवल उभारणीसाठी स्वमालकीची ९९.२७ एकर जमीन एकूण ४०० कोटी एवढ्या रकमेस विक्री करण्याचा प्रस्ताव पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीस ३० ऑक्टोबर २०२४ रोजी दिला होता. त्यानुसार पुणे बाजार समितीच्या उपबाजार आवारासाठी जमीन खरेदी करण्यासाठी बारा एकरच्या परवानगीसाठीचा प्रस्ताव नुकताच पणन संचालनालयास दिला आहे.- समिती कोरेगाव मूळची जागा विकणारबाजार समितीने शिवाजीराव भोसले सहकारी बँकेकडून हवेली तालुक्यातील कोरेगाव मूळ येथील १२ एकर जमीन ५३ कोटी १७ लाख ८८ हजार ७०४ रुपयांना दि. ७ ऑक्टोबर २०२२ रोजी खरेदी केलेली आहे. दरम्यान, थेऊरमधील जागा खरेदीसाठी निधीची उपलब्धता व्हावी म्हणून कोरेगाव मूळ येथील उपबाजाराची जागा जाहीर लिलावाने पणन संचालकांच्या कलम १२(१) अन्वये परवानगी घेऊन विक्री करणे तसेच राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्ज घेऊन यशवंत सहकारी साखर कारखान्याची जमीन खरेदी करण्याबाबतचा निर्णय बाजार समितीने बहुमताने घेतल्याचे प्रस्तावात नमूद केले आहे.९९.२७ एकर जमीन खरेदी करण्याचा प्रस्तावयशवंत सहकारी साखर कारखान्याच्या मालकीची ९९.२७ एकर जमीन खरेदी करण्याचा प्रस्ताव पणनकडे परवानगीसाठी दाखल केला आहे. वरिष्ठ कार्यालयाने या प्रस्तावावर मागविलेली अधिकची माहितीदेखील देण्याचे काम पूर्ण झाले आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने ‘यशवंत’ साखर कारखान्यांची ९९ एकर जागा खरेदीचा प्रस्ताव पणनकडे आला आहे. याबाबत शासकीय नियमांच्या आधीन राहून खरेदी केली जाणार आहे. - विकास रसाळ, राज्य पणन संचालक