पुणे : सगळ्या मोठ्या निवडणुकांमध्ये राजकीय पक्ष असूनही तटस्थ रहायचे किंवा विरोध करायचा किंवा मग काहीही न मागता फक्त प्रचार करायचा. यामुळे त्रस्त झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांसमोर आता निदान येत्या विधानसभा व महापालिका निवडणुकीत तरी आम्हाला उमेदवारी करता येईल की नाही, असा प्रश्न उभा राहिला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर काही मनसैनिकांचा कानोसा घेतला असता, आम्ही लोकसभेत महायुतीचा मनापासून प्रचार केला, आता त्यांनी येत्या निवडणुकांमध्ये आमचा विचार करावा, अशीच भावना असल्याचे दिसते.
राज ठाकरे पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्यांच्यावर आमचा विश्वास आहे, मात्र त्यांचे अनाकलनीय निर्णय पचनी पडत नाहीत, असे बऱ्याच मनसैनिकांचे म्हणणे आहे. मागील लोकसभा निवडणुकीत स्वत: राज यांनी भाजपच्या विरोधात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा थेट विरोध करत राज्यात जाहीर सभा घेतल्या. त्यांच्या ‘लाव रे तो व्हिडीओ’ने देशाचे राजकीय क्षेत्र गाजवले. मात्र भाजपवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. उलट ते मोठ्या संख्येने राज्यात निवडून आले. त्याहीवेळी मनसे लोकसभा लढवणार नाही, असे राज यांनी जाहीर केले होते. त्यानंतरची विधानसभा निवडणूक मनसेने स्वतंत्रपणे लढवली, मात्र सर्व जागांवर उमेदवारच उभे करता आले नाही. तरीही राजू पाटील म्हणून त्यांचे एक आमदार निवडून आले. त्यानंतर महापालिकेच्या संभाव्य सार्वत्रिक निवडणुकाच लांबणीवर पडत गेल्या आहेत. राज्यात एकाही महापालिकेची निवडणूक न्यायालयीन प्रकरणांमुळे झालेली नाही. त्यामुळेच मनसेचे बहुसंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते राजकीय पक्षाचे काम करत असूनही लोकप्रतिनिधी होण्यापासून वंचितच राहिलेले आहेत.
मनसैनिकातील खदखद हाेतेय उघड!
पुण्यात कसबा विधानसभेची पोटनिवडणूक झाली. त्यातही राज यांनी ‘आम्ही निवडणूक लढवणार नाही’ असे जाहीर केले. काँग्रेसकडून लढणारे रवींद्र धंगेकर हे उमेदवार मूळ मनसेचेच होते. तरीही त्यांचा प्रचार करणाऱ्या ५० पेक्षा जास्त कार्यकर्त्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. राजकीय पक्ष असूनही निवडणूक लढवायची नाही, मग आपली ताकद किती आहे, हे कळणार तरी कशातून, असा मनसैनिकांचा प्रश्न आहे. टोल नाक्यांना विरोध, प्रार्थनास्थळांवरचे भोंगे, सार्वजनिक ठिकाणाची अतिक्रमणे, मराठीतील पाट्या अशा आंदोलनांमध्ये खळखट्याक करत गुन्हे अंगावर घ्यायचे व मग निवडणूक आली की ऐनवेळी दुसऱ्यांसाठीच राबायचे हा काय प्रकार आहे, असे मनसैनिकांमध्येच आता बोलले जात आहे.
दुसऱ्यांसाठी सभा घ्यावी लागणे याचे शल्य
लोकसभेची निवडणूक नुकतीच झाली. या निवडणुकीत एकदम यू-टर्न घेत राज यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केला, मात्र हा पाठिंबा विनाशर्त आहे, असे सांगत लोकसभेची एकही जागा मागितली नाही किंवा लढवली नाही. उलट मनसैनिकांना विधानसभेच्या तयारीला लागा, आता लोकसभेला महायुतीचे काम करा, असा आदेश देत स्वत:ही महायुतीसाठी जाहीर सभा घेतल्या. राज यांची जाहीर सभा मनसैनिकांसाठी जीव की प्राण, पण ते दुसऱ्यासाठी अशा सभा घेत असल्याचा सल व शल्यही मनसैनिकांच्या मनात आहे.
विधानसभेला चांगल्या जागा मिळाव्यात!
आदेश होता त्याप्रमाणे आम्ही लोकसभेत महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार केला, आता विधानसभेसाठी राज यांनी त्यांच्याबरोबर चर्चा करून चांगल्या जागा मागून घ्याव्यात, अन्यथा फक्त मुंबईतील काही जागा देऊन ते राज्यातील सगळ्या मनसैनिकांना त्यांच्या प्रचारात राबवून घेतील, अशी भीती मनसैनिकांच्या मनात आहे. महापालिका निवडणुकीत एका प्रभागात ४ नगरसेवक याप्रमाणे शिंदे सरकारने कायद्यात बदल करून घेतला आहे. त्यामुळे महायुतीच्या पॅनेलमध्ये मनसैनिकांनाही सामावून घेण्याबाबत राज यांनी आग्रही रहायला हवे, असे मनसेच्या बहुसंख्य कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे मत आहे.
पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेकदा पक्षासाठी म्हणूनच महायुतीला पाठिंबा दिला असल्याचे जाहीर केले आहे. विधानसभेच्या तयारीला लागा हा आदेशही त्यांनी दिला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत व पुढे महापालिका निवडणुकीतही आम्ही असणारच आहोत. त्यांच्याबरोबर की स्वतंत्र याचा निर्णय राज ठाकरे घेतील. मनसैनिकांसाठी त्यांचे धोरण व त्यांचा निर्णय महत्त्वाचा आहेत. मनसैनिकांच्या मनात काही संभ्रम असेल, असे वाटत नाही.
- राजेंद्र वागसकर, मनसे नेते, महाराष्ट्र