हिंजवडी : दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यासाह अवकाळी पावसाने आयटी पार्क परिसरात अक्षरशः दाणादाण उडाली. फेज दोनमधील मुख्य रस्त्यालगत असलेले एक महाकाय होर्डिंग कोसळले, तर माणमध्ये झाड उन्मळून पडले. दोन्ही घटनांमध्ये केवळ दैव बलवत्तर म्हणून जीवितहानी टाळली. मात्र, वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हिंजवडी, माण परिसरात सोमवारी (दि. २२) दुपारी अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली. वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने आयटी पार्क परिसरात अनेक फ्लेक्स फाटले, फेज दोनमधील मुख्य रस्त्यावर विप्रो सर्कलजवळ महाकाय होर्डिंग कोसळल्याने त्याखाली एक चारचाकी आणि अनेक दुचाकी अडकून पडल्या होत्या. अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर ही घटना घडल्याने मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे परिसरातील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. मोठा आवाज झाल्याने घटनेचे गांभीर्य ओळखून लक्ष्मण बोडके, निखिल बोडके, रवींद्र बोडके, स्वप्निल बोडके यांनी तत्काळ धाव घेत वाहतूक सुरळीत केली. तसेच अडकलेल्या दुचाकी बाहेर काढण्यासाठी मदत केली.
दुसऱ्या घटनेत वादळी वाऱ्यामुळे माण रस्त्यावर भरणे वस्तीजवळ एक झाड उन्मळून पडले. नवनाथ पारखी, हाणमंत पारखी, संदीप पारखी, शरद बाराहाते यांसह स्थानिक तरुणांनी प्रसंगावधान दाखवत झाड बाजूला केले. दरम्यान, अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जनावरांचा चारा भिजला, परिसरात अनेक ठिकाणी गहू, ज्वारी काढणी हंगाम सुरू आहे. धान्य भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या घटनेमुळे आयटीनगरी परिसरातील अनधिकृत महाकाय होर्डिंगचा मुद्दा, पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, प्रशासनाने याबाबत ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे.
फोटो : अचानक आलेल्या वादळी पावसामुळे विप्रो सर्कलजवळील महाकाय होर्डिंग कोसळल्याने वाहनांचे नुकसान झाले तर, दुसऱ्या छायाचित्रात माण रस्त्यावर झाड उन्मळून पडले.