लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : विधानसभा अधिवेशन संपल्यानंतर आता पोलीस दलात बदलीचे वारे सुरू झाले आहे. जिल्ह्यांमधील ६ वर्षे सेवा पूर्ण झालेल्या कर्मचारी-अधिकाऱ्यांची बदलीसाठीची माहिती पोलीस महासंचालक कार्यालयाकडून मागविण्यात आली आहे. स्थानिक पातळीवर बदल्यांचे वारे सुरू झाले आहेत. त्यामुळे चांगल्या जागी पोस्टिंग मिळण्यासाठी ‘फिल्डिंग’ लावणे सुरू झाले आहे.
पोलीस निरीक्षक यांची कोणत्याही एका जागेवर २ वर्षे काम झाले की त्यांची बदली केली जाते. तसेच सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक यांची ३ वर्षे आणि कर्मचाऱ्यांची ५ वर्षे एका पोलीस ठाण्यात कार्य झाले की त्यांची बदली केली जाते. पोलीस अधिकाऱ्यांची एका जिल्ह्यात ६ वर्षे झाली की त्यांची बदली केली जाते. या काळात अधिकाऱ्यांचे त्या जिल्ह्यात बस्तान बसलेले असते. विशेषत: घरात पत्नी, मुले, त्यांचे शिक्षण असे सर्व रुटीन बसलेले असते. त्यामुळे मग अनेक अधिकारी ‘साईड ब्रॅंच’ म्हटल्या जाणाऱ्या लाचलुचपत, सीआयडी येथे बदली होईल, यासाठी प्रयत्न करतात. अनेक जण मुला-मुलींची दहावी, बारावी ही शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाची वर्षे असताना त्यांच्याकडे अधिक लक्ष देता यावे, यासाठी पोलीस ठाण्याऐवजी साईट ब्रॅंचला पसंती देतात.
चौकट
या पोलीस ठाण्यांना पसंती
पुणे शहराचा विस्तार आता वाढतो आहे. नुकतीच ग्रामीण पोलीस दलातील २ पोलीस ठाणी पुणे शहर पोलीस दलात समाविष्ट झाली आहे. शहराच्या उपनगरांमध्ये असलेल्या पोलीस ठाण्यात बदली व्हावी, अशी अनेकांची अपेक्षा असते. मोठा विस्तार व काम करून दाखवण्याची अधिक संधी असते. त्याचबरोबर बहुतांश अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गुन्हे शाखेत काम करण्याची इच्छा असते. येथे काम करायला मोठी संधी आणि त्यामानाने बंदोबस्तासारखी कामे नसतात.
चौकट
या ठाण्यात नको रे बाबा !
बंडगार्डन, विश्रामबाग आणि फरासखाना ही शहरातील तीन पोलीस ठाणी अधिकाऱ्यांच्या बॅड बुकमध्ये असतात. या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मोर्चा, आंदोलने याचेच काम अधिक असते. बंदोबस्ताच्या कामातच तेथील अधिकाऱ्यांचा दिवसेंदिवस जातो. जिल्हाधिकारी कार्यालयावर दररोज कोणी ना कोणी पक्ष संघटना मागण्यांसाठी मोर्चे, निवेदने घेऊन येत असतात. बंडगार्डनच्या हद्दीतच समाज कल्याण, सेंट्रल बिल्डिंग, विभागीय आयुक्तालय अशी कार्यालये आहेत. तेथे कायमच व्हीआयपीची ये-जा सुरू असते.
विश्रामबाग, फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती, मंडई गणपती तसेच मध्यवस्तीचा भाग, बाजारपेठेचा भाग येतो. येथेही बंदोबस्ताचे काम अधिक असते. शिवाय दहीहंडी, गणेशोत्सवाचा सर्वाधिक बंदोबस्त या दोन पोलीस ठाण्यांना करावा लागतो. त्यामुळे या पोलीस ठाण्यात बदली अनेकांना नकोशी वाटते.