ओतूर / निमसाखर : शुक्रवारी तिसऱ्या दिवशीही जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पाऊस झाला. जुन्नर तालुक्यातील ओतूर व इंदापूर तालुक्यातील निमसाखर येथे वादळाचा मोठा फटका बसला. ओतूरच्या उत्तरेकडील रोहोकडी, आंबेगव्हाण, पाचघर, चिल्हेवाडी येथे पिकांचे मोठे नुकसान झाले तर निमसाखरला झाड अंगावर पडून म्हैस मृत्युमुखी पडली.ओतूर परिसरात सायंकाळी वादळी वारा व गारांचा पाऊस झाला. रोहोकडी भागात केळीच्या बागा उन्मळून पडल्या, कांदा चाळीचे पत्रे, घराची कौले उडून गेली. टोमॅटोची झाडे उन्मळून ती जमीनदोस्त झाली. आंब्याची झाडे व इतर झाडे उन्मळून पडली. आंब्याच्या कैऱ्यांचा खच पडला. वारे इतके जोराचे होते की, कैऱ्या २०० फूट लांब फेकल्या गेल्या. फापाळे शिवारात टोमॅटो, केळी व शेतात असणाऱ्या कांद्याच्या ऐरणी पावसामुळे भिजल्या. टोमॅटोची झाडे उन्मळून पडली. आंबा पिकाचे डाळींबाचे फार नुकसान झाले. आंब्याच्या झाडाला आंबा राहिला नाही. डाळिंबाची फळेही व झाडेही उन्मळून पडली. येथील ज्ञानेश्वर फापाळे यांनी दोन दिवसांपूर्वी नवीन घरावर नवीन पत्रे बसविले होते तेही उडून त्यांचे २ लाख रु. नुकसान झाले. शेतातील व रस्त्यावर अनेक झाडे उन्मळून पडली. आंबेगव्हाण पाचघर विभागत घरांचे पत्रे उडाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले. त्याच प्रमाणे केळीच्या बागा व टोमॅटोच्या बागा उध्वस्त होऊन शेतकऱ्यांचे फार मोठया प्रमाणात नुकसान झाले.या तीनही ठिकाणी शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करावे, अशी मागणी सरपंच धनंजय डुंबरे, कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दिलीप डुंबरे, संचालक रंगनाथ पाटील घोलप यांनी रोहोकडी पाचघर आंबेगव्हाण फापाळे शिवार अहिनेवाडी शेतकऱ्यांच्या वतीने केली आहे. (वार्ताहर)
वादळी फटका!
By admin | Published: May 14, 2016 12:33 AM