पुणे : कडक उन्हामुळे तप्त झालेल्या भूमीला रविवारी दुपारनंतर झालेल्या वरुणराजाने तृप्त केले. उष्णतेमुळे पुणेकरांच्या अंगाची लाहीलाही झाली होती. त्यांना या पूर्वमोसमी पावसाने दिलासा दिला. ‘आला आला वारा, संगे पावसाच्या धारा’ या गाण्याची आठवणच जणू काही या पावसाने करून दिली आणि झाडे, पाने हसू लागली... फुले-पाखरे गाऊ लागली... काळ्याकाळ्या मेघांमधुनी शुभ्र धारा झरू लागल्या आणि निसर्गामध्ये नवचैतन्य पसरले.शहर व परिसरात अनेक भागात रविवारी पावसाच्या सरी कोसळल्याने हवेत गारवा निर्माण झाला. काही भागात पावसाचा जोर असल्याने झाडे पडल्याच्या घटनाही घडल्या. पावसामुळे रस्ते निसरडे झाल्याने काही भागात दुचाकी घसरून पडल्या.शहराच्या कमाल तापमानाचा पारा ४० अंशाच्या जवळ गेला होता. त्यामुळे उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. मागील आठवड्यात राज्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाने रविवारी मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाची शक्यता व्यक्त केली होती. त्यानुसार दुपारनंतर ढग दाटून येण्यास सुरूवात झाली. दुपारी साडेचारच्या सुमारास शहराच्या अनेक भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरींना सुरुवात झाली. यावेळी विजांच्या कडकडाटासह वाराही सुटला होता. काही भागात पावसाला जोर होता. सायंकाळी साडेपाचपर्यंत शहरात४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. शहरासह पाषाण, बाणेर, वडगाशेरी चंदननगर, कोथरूड, उत्तमनगर, सिंहगड रस्ता, खडकवासला, सूस रस्ता यांसह काही भागात पावसाने हजेरी लावली.दरम्यान, पावसामुळे पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. कमाल तापमानात घट झाल्याने हवेत गारवा निर्माण झाला. भवानी पेठ, सूस रस्ता तसेच दोन-तीन ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या. कोथरूडमधील झाडाची मोठी फांदी तुटली. शहरातील अनेक भागात रस्त्यांवर पावसाळी गटारे तुंबल्याने ठिकठिकाणी पाण्याची तळी साचली होती. काही भागात पावसाचा जोर असल्याने रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहिले. तर काही भागात रिमझिम पावसाने रस्ते निसरडे झाल्याने दुचाकी घसरून पडण्याची प्रकार घडले.
आला आला वारा, संगे पावसाच्या धारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 6:38 AM