लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : फरांदे क्रिकेट अॅकॅडमी आणि स्टेडियम क्रिकेट क्लब संघांनी अनुक्रमे पूना क्लब व क्रिकेट मास्टर्स अॅकॅडमी संघाचा पराभव करून फरांदे करंडक १६ वर्षांखालील आंतरक्लब स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. बुधवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात रोहित हाडके आणि प्रेम गव्हाणे यांना सामनावीर किताब देण्यात आला.विधी महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत रोहित हाडके याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर आयोजक फरांदे सीए संघाने पूना क्लबचा ६ गडी राखून सहज पराभव केला. पूना क्लब संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना २९.२ षटकांत सर्व बाद १७४ धावांचे आव्हान उभे केले. यामध्ये कपिल देडगे २३, अर्शिन कुलकर्णी ३१ व चंद्रकांत सरोज २३ धावा यांनी संघाला पावणेदोनशेचा टप्पा गाठून दिला. फरांदे संघाकडून गोलंदाजीमध्ये सार्थक वाळके (४-१६) व रोहित हाडके (२-३७) यांनी चमकदार कामगिरी केली. या आव्हानाचा पाठलाग फरांदे क्रिकेट अॅकॅडमीने २३ षटकांत व ४ गडी गमावून पूर्ण केले. सौरभ देवगांडे (२५), रौनक हारकाळे (५०) व रोहित हाडके (४७) यांनी आवश्यक धावा करत संघाला विजय मिळवून दिला.दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात प्रेम गव्हाणे याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर स्टेडियम सीसी संघाने क्रिकेट मास्टर अॅकॅडमीचा ७ गडी राखून सहज पराभव केला. सीएमए संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना ३० षटकांत ९ बाद १५५ धावा केल्या. प्रथमेश कारंडे २४, हृषीकेश गेंड ३० व उत्कर्ष चौधरी ३० यांनी संघाला दीडशे धावांचा टप्पा गाठून दिला. गोलंदाजीमध्ये स्टेडियम सीसीकडून प्रेम गव्हाणे ३-३७, अखिलेश गवाळे २-२०, सनथ परदेशी २-४१ यांनी चमकदार गोलंदाजी केली. स्टेडियम क्रिकेट क्लबने हे आव्हान २२ षटकांत व ३ गडी गमावून पूर्ण केले. यश तुंगे २१, प्रेम गव्हाणे ४१ धावा व अखिलेश गव्हाळे (नाबाद ५८) यांनी संघाला विजय मिळवून देत अंतिम फेरीतील संघाचे स्थान निश्चित केले. संक्षिप्त धावफलक (उपांत्य फेरी) : पूना क्लब : २९.२ षटकांत सर्व बाद १७४ (कपिल देडगे २३, अर्शिन कुलकर्णी ३१, चंद्रकांत सरोज २३, सार्थक वाळके ४-१६, रोहित हाडके २-३७) पराभूत वि. फरांदे क्रिकेट अॅकॅडमी : २३ षटकांत ४ बाद १७८ (सौरभ देवगांडे २५, रौनक हारकाळे ५०, रोहित हाडके ४७, ओम धरावडे १-१७); सामनावीर : रोहित हाडके (फरांदे सीए); क्रिकेट मास्टर अॅकॅडमी : ३० षटकांत ९ बाद १५५ (प्रथमेश कारंडे २४, हृषीकेश गेंड ३०, उत्कर्ष चौधरी ३०, प्रेम गव्हाणे ३-३७, अखिलेश गवाळे २-२०, सनथ परदेशी २-४१) पराभूत वि. स्टेडियम क्रिकेट क्लब : २२ षटकांत ३ बाद १५६ (यश तुंगे २१, प्रेम गव्हाणे ४१, अखिलेश गव्हाळे नाबाद ५८, आदित्य मावळे १-१०); सामनावीर : प्रेम गव्हाणे (स्टेडियम सीसी).
फरांदे अॅकॅडमी-स्टेडियम क्लब यांच्यात विजेतेपदासाठी लढत
By admin | Published: May 11, 2017 4:51 AM