पुणे : आमची महायुती भक्कम आहे, बारामतीत लोकसभेचा विजयी उमेदवार महायुतीचाच असेल असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. बारामतीत उमेदवार कोण असेल हे सांगण्याचे मात्र त्यांनी टाळले. पक्षाच्या लोकसभा प्रवास योजनेची आढावा बैठक बावनकुळे यांच्या उपस्थितीत मंगळवारी पुण्यात झाली. त्यानंतर पत्रकरांबरोबर बोलताना बावनकुळे यांनी काँग्रेसला लक्ष्य करण्याबरोबरच उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. ही बैठक पक्षाची होती, त्यामुळे लोकसभेचे ऊमेदवार कोण, जागा कोणाला किती मिळणार हे ठरवण्यासाठी नव्हती असेही ते म्हणाले.
राज्यात एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहणार आहे. याबाबतीत काँग्रेस विनाकारण दिशाभूल करत आहे. त्या पक्षात प्रचंड अस्वस्थता आहे. त्यांना साधा विरोधी पक्ष नेता कोणाला करायचे हेही ठरवता येत नाही यावरून त्यांची स्थिती दिसते. विरोधी पक्षनेता झाला की तो भाजपकडे येतो. सभागृहातील त्यांच्या आमदारांमध्येही चर्चा आहे की आपले भविष्य काय? कारण देशात मोदींना पर्याय नाही हे त्यांना कळून चुकले आहे. आम्ही काही संन्यासी नाही आमची विचारधारा मान्य करणाऱ्यांसाठी आमचा कमळाचा दुपट्टा तयार आहे. काँग्रेसच्या कोणी यायचे म्हटले तरी आमची तयारी आहे. आम्ही कोणाकडे जाणार नाही, पण कोणी आमच्याकडे येत असेल तर नाहीही म्हणणार नाही, असे बावनकुळे म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांची मानसिक अवस्था आता मनोरूग्णालयात दाखल करण्यासारखी झाली आहे. त्यांनी राजकीय टीका करावी, पण ते वैयक्तिक बोलतात, खेकडे म्हणा, आणखी काही म्हणा याला अर्थ नाही. त्यांची मनस्थिती ठीक नाही आता जे काही त्यांच्याकडे राहिले आहेत, ते आमदार, खासदारही आता त्यांच्याकडे फार दिवस राहणार नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेच्या ५ वर्षात त्यांना फार सांभाळले.