पुणे : पुणे पोलिसांना सर्वाधिक काम याच भागात असते. यावरून या भागाची ओळख पटायला हरकत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून इथे हिच स्थिती आहे. मात्र, याचा अर्थ इथे कायम गुन्हेगारीच सुरू असते, असे नाही. पुण्यातील सर्वाधिक सामाजिक कामेही, त्यात वारकरी भोजन असेल किंवा पालख्यांचे स्वागत याच भागात होत असते. हीही याची एक वेगळी ओळख आहे. पुण्याचा पूर्व भाग असे याला म्हणतात. त्यात कौतुकापेक्षाही उपरोधच जास्त आहे. काँग्रेसचे काही काळापूर्वीपर्यंत इथे कायमचे वर्चस्व होते, मात्र ते पक्षाचे नसून व्यक्तींना मानणाऱ्यांचे होते. त्यामुळे त्या-त्या व्यक्तींनी पक्ष बदलला की त्यांचा जो पक्ष असेल त्या पक्षाचे वर्चस्व झाले, असे म्हणायचे.नुकत्याच दिवंगत झालेल्या नगरसेविका राजश्री आंदेकर व विद्यमान नगरसेवक उदयकांत आंदेकर यांचा जुना ४८ क्रमांकांचा प्रभाग यात कायम आहे. दोघेही राष्ट्रवादी काँग्रेसचे. मनसेचे रवींद्र धंगेकर, अनिता डाखवे यांचा जुना ३८, सोनम झेंडे, गणेश बिडकर यांचा ३९, सुनंदा गडाळे, मिलिंद काची यांचा ४९ अशा जुन्या प्रभागांमधील काही परिसर जोडून हा नवा प्रभाग क्रमांक १७ तयार झाला आहे. क्षेत्रफळ कमी असले, तरी लोकसंख्या मात्र बरीच, म्हणजे मतदारसंख्या जास्त, अशी स्थिती आहे. बहुसंख्य मतदार इथले जुने, काही पिढ्यांचे रहिवासी आहेत. त्यामुळे सगळ्याच उमेदवारांबरोबर त्यांची किंवा कुटुंबातील किमान एका सदस्याची तरी जवळीक असतेच. साहजिकच त्याचा मतांवर परिणाम होतो. त्यामुळेच पक्षापेक्षाही वैयक्तिक संपर्कावरच इथली निवडणूक होते.उदयकांत आंदेकर राष्ट्रवादीकडून पुन्हा इच्छुक आहेतच. त्याशिवाय त्यांच्या कुटुंबातीलच बंडूअण्णा आंदेकर, वनराज आंदेकर, लक्ष्मी आंदेकर हेही निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. याशिवाय संदीप पाथरेकर, चेतन मोरे, किरण कद्रे, माजी नगरसेवक दत्ता सागरे यांनीही पक्षाच्या वरिष्ठांकडे उमेदवारीची इच्छा व्यक्त केली असून, त्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तिकीट मिळणारच आहे, पण नाहीच मिळाले, तर स्वबळावर लढविण्याचीही तयारी काही जणांनी सुरू करून तसे जाहीरही केले आहे.काँग्रेसलाही इथले त्यांचे जुने वैभव परत आणायचे आहे. माजी नगरसेवक वीरेंद्र किराड यांनी त्यासाठी कंबर कसली आहे. मनीष आंदे हे काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेपासून पक्षात कार्यरत असलेले आणखी एक इच्छुक आहेत. त्यांच्या पत्नी सुनीता आंदे यांनी यापूर्वी दोन वेळा काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढविली. मागील वेळी त्यांना साडेचार हजार मते मिळाली. त्यामुळे यंदाही मनीष आंदे त्यांच्यासाठी किंवा स्वत:साठी इच्छुक आहेत. राजेंद्र पडवळ, जयंत किराड, प्रशांत भिलारे, शिवा भोकरे हे आणखी काही इच्छुक आहेत. भाजपात प्रवेश केला अशी चर्चा असलेल्या व नंतर प्रवेश केलाच नव्हता, असे जाहीर केलेल्या नगरसेविका सुनंदा गडाळे यांनाही इथून निवडणूक लढवायची असल्याचे बोलले जात आहे. स्वाती कतलकर, राजू शेख हेही काँग्रेसच्या तिकिटासाठी इच्छुक आहेत. आपले काम करेल तो आपला, अशा या भागातील बहुसंख्य मतदारांचा राजकीय समज आहे. त्यामुळेच उमेदवार विविध उपक्रमांनी मतदारांशी कायम संपर्क कसा राहील यासाठी प्रयत्न करीत असतात. सार्वजनिक कामांपेक्षाही एखाद्या भागातील नागरिकांसाठी बाक देणे, वैयक्तिक स्वरूपाची कामे करणे यावरच उमेदवारांचा भर असतो. हा संपर्क ज्यांचा जास्त ते विजयी, असे इथले गणित आहे. (प्रतिनिधी)
जनसंपर्कच ठरविणार विजयाचे गणित
By admin | Published: November 08, 2016 1:47 AM