लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे शहराच्या विविध भागांमध्ये शुक्रवारी (दि. २०) सायंकाळी पावसाने हजेरी लावली. सूर्यास्तानंतर वारंवार कोसळलेल्या जोरदार सरींनी नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
गेल्या तीन-चार दिवसांपासून हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळा या तिन्ही ऋतूंचा अनुभव पुणेकरांच्या वाट्याला येत आहे. ढगाळ वातावरण, पावसाच्या सरी, घामाच्या धारा काढणारे उन आणि मध्येच पहाटेच्या वेळी गुलाबी थंडी असे विचित्र हवामान झाले आहे.
शुक्रवारी संध्याकाळी मात्र पावसाळ्यासारखा पाऊस पुण्याच्या सर्व भागात झाला. येत्या दोन दिवसात ढगाळ हवामान आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस हे हवामान शहरात कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.