पुणे : उन्हाळा सुरू झाला असे म्हणत असताना अचानक गेल्या दोन दिवसांपासून बोचऱ्या थंडीचा सामना करावा लागलेल्या पुण्यात या हंगामातील सर्वात कमी निच्चांकी ५.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या दहा वर्षातील फेब्रुवारी महिन्यातील हे दुसरे निच्चांकी तापमान आहे. ९ फेब्रुवारी२०१२ मध्ये ४.६ अंश सेल्सिअसची नोंद झाली होती. फेब्रुवारीत आता पर्यंत सर्वात निच्चांकी किमान तापमान ३.९ अंश सेल्सिअस १ फेब्रुवारी १९३४ मध्ये नोंदविले गेले होते.
उत्तरेत होत असलेल्या बर्फवृष्टीबरोबरच राज्यातील कोरड्या हवामानामुळे उत्तरेच्या वाऱ्यांचा जोर पुन्हा वाढल्याने राज्यात थंडीची लाट आली आहे. पुणे शहरात शुक्रवारी सकाळी १०.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती. त्यात शनिवारी निम्म्याने तब्बल ५ अंशांची घट होऊन ते ५.१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. या हंगामातील हे सर्वात कमी किमान तापमान आहे.
फेब्रुवारी महिन्यात उन्हाळ्याची चाहुल लागण्यास सुरुवात होत असतानाच या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद शनिवारी सकाळी राज्यातील अनेक शहरात नोंदविली गेली आहे.
मुंबईत पारा ११ अंशापर्यंत खाली आहे. नाशिक ४, निफाड ३, सांताक्रुझ ११, सातारा ६.८, सोलापूर १२.१, नंदूरबार ६.९, सांगली ८.४ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.
कोकणातही अनेक ठिकाणी एका बाजूला थंडीची लाट तर दुसरीकडे समुद्रावरुन वेगाने येणारे वारे यामुळे कोकणी माणूसही गारठून गेला आहे.