लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे शहरासोबतच ग्रामीण भागात देखील कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. हिंजवडी येथील विप्रो कोव्हिड हाॅस्पिटलमध्ये गेल्या पंधार दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या १५ वरून थेट २१८ वर जाऊन पोहोचली आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता तातडीने दोन एमडी आणि प्रत्येकी दहा एमबीबीएस आणि १० बीएचएमएस डॉक्टरांची कंत्राटी पद्धतीने भरती केली जाणार आहे.
हिंजवडी येथील विप्रो हॉस्पिटलमध्ये ग्रामीण भागातील रुग्णांच्या उपचारांची अद्यावत सुविधा आहे. ४५० बेड क्षमता असणाऱ्या या हॉस्पिटलमध्ये सध्या २१८ रुग्ण दाखल आहेत. या कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि व्यवस्थापन याबद्दल अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे म्हणाले की, गेल्या पंधरा दिवसांपूर्वी अवघे १५ रुग्ण हॉस्पिटलमध्ये होते, आज ही संख्या २१८ वर जाऊन पोहोचली आहे. दररोज २५ ते ३० च्या संख्येने नवे रुग्ण दाखल होत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरू केले जाणार आहे.
याबाबत शेडगे यांनी सांगितले, रुग्ण संख्या वाढत असल्याने दोन एमडी डॉक्टरांची नेमणूक केले आहेत. तसेच येत्या आठवडाभरात आणखी वीस डॉक्टर या रूग्णालयाच्या सेवेत दाखल होतील. या डॉक्टरांचे पगार आणि व्यवस्थेचा खर्च विप्रो कंपनीने करण्याची तयारी दाखवली आहे. या ठिकाणी सर्व ऑक्सिजन बेडची सुविधा आहे. तरी देखील ११ आयसीयू बेड तातडीच्या उपचारासाठी तयार केले आहेत.