लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : हिंजवडी येथील विप्रो कोविड हाॅस्पिटलमध्ये ऑक्सिजन लागणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने विप्रो कंपनीने या कोविड हाॅस्पिटलमध्ये तब्बल १५० बेड्सचा सुसज्ज असा ऑक्सिजन वाॅर्ड तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. ऑक्सिजन यंत्रणा उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, पुढील पंधरा दिवसांत हे काम पूर्ण होईल, अशी माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे यांनी दिली.
ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांना उपचार घेण्यासाठी थेट पुणे शहर अथवा पिंपरी-चिंचवड शहराची वाट धरावी लागते. याच पार्श्वभूमीवर विप्रो कंपनीने पुढाकार घेत सर्व सोयी-सुविधांसह तब्बल ४५० बेड्सचे सुसज्ज कोविड हाॅस्पिटल उभारून चालविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ताब्यात दिले. वर्षी १३ जुलैपासून हे कोविड हाॅस्पिटल रुग्णसेवेत दाखल असून, आतापर्यंत ३ हजार ६०० रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. विप्रो कोविड हाॅस्पिटलसाठी लागणारे सर्व आरोग्य कर्मचारी जिल्हा परिषदेने पुरवले आहेत. तर रुग्णालयाचा इतर सर्व खर्च म्हणजे स्वच्छतेपासून रुग्णांच्या जेवण खाण्याचा खर्च विप्रो कंपनी करत आहे. विप्रो कोविड रुग्णालयात गंभीर रुग्णांच्या उपचाराची सोय नसली तरी सर्वसाधारण कोविड रुग्णांना येथे उत्तम उपचार व सोयीसुविधा मिळत असल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे.
-------
रुग्णांची ऑक्सिजनची गरज वाढत आहे
कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत कोविड रुग्णांना ऑक्सिजन लागण्याचे प्रमाण वाढले आहे. यासाठीच विप्रो कोविड हाॅस्पिटलमध्ये तातडीने ऑक्सिजन यंत्रणा उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. येत्या पंधरा दिवसांत हे काम पूर्ण होईल. यानंतर जिल्ह्यातील १५० रुग्णांना सुसज्ज ऑक्सिजन बेड्स उपलब्ध होतील. विप्रो कोविड हाॅस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर्स सुविधा नसली तरी कोविड रुग्णांवर चांगल्या प्रकारे उपचार केले जातात. यामुळेच येथे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे.
-भारत शेंडगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
------
विप्रो कोविड हाॅस्पिटलची माहिती
- आता पर्यंत दाखल कोविड रुग्ण : 4179
- बरे होऊन घरी गेलेले रुग्ण : 3600
- दुस-या रुग्णालयात पाठविण्यात आलेले रुग्ण : 277
- आतापर्यंत मृत्यू झालेले : 06
- एकूण ऑक्सिजन बेड्स : 381
-----