पुणे - स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीने त्यांच्या औंध, बाणेर, बालेवाडी या विशेष क्षेत्रातील औंध परिसरातल्या ब्रेमेन चौक ते परिहार चौक हा फक्त अर्धा किलोमीटरचा रस्ता असा तयार केला की त्याचे थेट श्रीलंकेतच कौतुक झाले. आता या परिसरातील विविध अंतरांचे एकूण ९ रस्ते असेच तयार केले जाणार आहेत. विशेष म्हणजे हे काम महापालिकेच्याच पथ विभागाने केले आहे.रस्ता होण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या दुकानदारांना थोडा त्याग करावा लागला आहे. मात्र तो केला हे फारच छान झाले, अशीच आता त्यांची व त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांचीही प्रतिक्रिया आहे. वाहने चालवणारेही खूश आहेत. पायी चालणाºयांना तर पदपथ म्हणजे प्लाझाच वाटत आहे. त्याशिवाय व्हिलचेअरवर असणारे रुग्ण, बाबागाडीत आईवडिलांबरोबर फिरणारी लहान मुले, बॅगा वाहून नेणारे प्रवासी, थोडे चालले की दम लागून बसण्याची गरज असणाºया वयस्क व्यक्ती असे सगळेच या रस्त्यावर बेहद्द खूश आहेत.हा रस्ताही याच परिसरातील अन्य सर्वसामान्य रस्त्यांप्रमाणेच गर्दीचा, वाहनकोंडीचा व पदपथावर पायही ठेवता येणार नाही असाच होता. महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी ते स्मार्ट सिटी कंपनीचे सीईओ असताना या रस्त्याची कल्पना मांडली होती. त्यानंतर महापालिकेतच अतिरिक्त आयुक्त असलेले राजेंद्र जगताप हे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी झाले. त्यांनी प्रसन्न देसाई यांना रस्त्याचे आरेखन करण्याचे काम दिले. त्यांनी आयबीआय कंपनीच्या साह्याने रस्त्याची पुनर्रचना केली. रस्ते व्यवस्थापनाचा एक आदर्श रस्ता त्यातून साकार झाला आहे.एकूण ३० मीटर लांबीच्या या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी प्रत्येकी ६ मीटर असे एकूण १२ मीटरचे प्रशस्त पदपथ आहेत. त्यातले तीन मीटर रस्त्याच्या बाजूच्या दुकानदारांनी दिले आहेत. त्यावरचा एकही वृक्ष पाडण्यात आला नाही. उलट तीन मीटरच्या रेघेत वृक्ष व तीन मीटरच्या रेघेत पदपथ अशी रचना करण्यात आली. प्रत्येक वृक्षाभोवती दगडी बांधणीचा पार करण्यात आला आहे. त्यावर अगदी निवांत बसता येते. संपूर्ण पदपथ एकाच लेवलमध्ये आहे. त्यामुळे त्यावरून व्हीलचेअरवर बसून रुग्णांना नेता येते, तसेच बाबागाडी चालते, प्रवाशांना त्यांचे साहित्य असलेल्या बॅगा वाहून नेता येतात, गृहिणींना त्यावरून शॉपिंग ट्रॉली नेता येते. त्यामुळे थोड्या अंतरावरच्या कामासाठी म्हणून दुचाकी वाहनाचा वापर करण्याचे प्रमाण या भागात एकदम कमी झाले आहे.गतिरोधकांच्या १२ मीटर आधीचा रस्ता दगडी फरसबंदीचा तयार झाला आहे. त्यामुळे वाहनांचा वेग गतिरोधक येण्याआधीच कमी होतो. संपूर्ण रस्ता काँक्रिटचा तयार करून घेण्यात आला आहे. अर्धा किलोमीटरच्या या रस्त्याला कुठेही खड्डा नाही किंवा नको असलेला चढ अथवा उतारही नाही. असाच पुढचा अर्धा किलोमीटर अंतराचा रस्ता याच पद्धतीने तयार होत आला आहे. याशिवाय आनंद पार्क, नागरस रोड, महादजी शिंदे रोड हेही असेच तयार करण्यात येणार आहेत.महापालिकेच्या पथविभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र राऊत व त्यांच्या सहकाºयांनी या रस्त्याचे काम करून घेतले आहे, अशी माहिती प्रसन्न देसाई यांनी दिली. राजेंद्र जगताप यांनी सांगितले की आदर्श रस्ता व्यवस्थापनाचे पहिले पारितोषिक इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ आर्किटेक्चर अॅण्ड इंटिरिअर डिझाइन यांनी या रस्त्याला दिले. श्रीलंकेत झालेल्या परिषदेत परवडणाºया दरातील रस्ता असे त्याचे कौतुक झाले. आता विशेष क्षेत्रातील अन्य रस्तेही असेच केले जाणार आहेत.शहरातील रस्ते मात्र खडबडीत1स्मार्ट सिटीच्या विशेष क्षेत्रातील रस्ते असे होत असताना पुणे शहरातील रस्ते मात्र खडबडीत, खड्डेयुक्त व कसलाही आकारउकार नसणारे का, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. जंगली महाराज रस्त्याचा बालगंधर्व ते डेक्कन असा भाग पुणे महापालिकेने त्याच पद्धतीने तयार केला असून, पुण्यातही आता सर्व प्रमुख रस्ते असेच करण्यात येणार असल्याचे पथ विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र राऊत यांनी सांगितले. त्याचे काम सुरू आहे अशी माहिती त्यांनी दिली.प्रत्यक्ष रस्ता तयार करतानाही फार बारकाईने विचार करण्यात आला आहे. बहुतेक रस्त्यांचे दुभाजक सिमेंट काँक्रिटचे तयार करतात. त्यात बरीच जागा जाते. या रस्त्यावरचा दुभाजक वृक्षराजीने तयार केला आहे. वाहने एकीकडून दुसरीकडे जाऊ नयेत यासाठी दुभाजकाभोवती स्टिलची जाळी बसवण्यात आली आहे. या रचनेमुळे रस्त्याची रुंदी वाढली. रस्त्याच्या मध्यभागात तसेच पदपथावरही दिवे आहेत. त्यामुळे दोन्ही ठिकाणी चांगला प्रकाश असतो.
रस्त्याचे श्रीलंकेतही कौतुक, स्मार्ट सिटीची कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 3:51 AM