- किरण शिंदे
पुणे : पुण्यातील आयटी इंडस्ट्रीजमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सॅलरी दुप्पट करण्याचं आमिष दाखवून बॉसने आपल्याच एका महिला सहकाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी केली. इतकच नाही तर त्या महिला कर्मचाऱ्याला वेगवेगळ्या कारणाने आपल्या केबिनमध्ये बोलावून विनाकारण त्रासही दिलाय. पुण्यातील औंध येथील आयटीआय रस्त्यावरील एका नामांकित आयटी कंपनी हा प्रकार घडला.
एका 31 वर्षीय महिलेने याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार बॉस असलेल्या रतनेश डांगी (वय 45, रा. पंचशील टॉवर्स, इआन आयटी पार्कच्या पाठीमागे, खराडी) याच्याविरोधात चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुलै 2023 पासून वेळोवेळी हा प्रकार घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी औंध येथील आयटीआय रस्त्यावर असणाऱ्या एका नामांकित आयटी कंपनीत कामाला आहे. आरोपीने मागील सहा महिन्यांपासून फिर्यादी यांचा पाठलाग करून मानसिक आणि शारीरिक त्रास दिला. फिर्यादी यांना वेगवेगळी कारणे सांगून आरोपीने आपल्या केबिनमध्ये बोलावले. फिर्यादींच्या इच्छेनुसार त्यांच्या शरीराला स्पर्श केला. तसेच पगार दुप्पट करण्याचं आमिष दाखवून त्यांच्याकडे शारीरिक सुखाची मागणी केली. तसेच याबाबत कुणाला काही सांगितले तर मारून टाकण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. चतु:शृंगी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.