पुणे :पुणेविमानतळावर (pune international airport) प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन टर्मिनल उभारण्याचे काम सुरू आहे. पाच लाख चौरस फुटांपेक्षा अधिक जागेत जवळपास ४७५ कोटी रुपये खर्चून हे नवे टर्मिनल बांधले जात आहेत. सध्या याचे ६५ टक्के काम पूर्ण झाले असून, डिसेंबर २०२२ पर्यंत नवीन टर्मिनलवरून प्रवासी वाहतूक सुरू होईल. नवीन व जुने टर्मिनल एकमेकांना जोडले जाणार आहेत. नव्या टर्मिनलमुळे विमान वाहतुकीत वाढ होईल. सध्या रोज ६५ ते ७० विमानाची ये -जा असते. नवीन टर्मिनल झाल्यानंतर मात्र रोज २५० विमानाचे उड्डाण होणार आहे. यात आंतरराष्ट्रीय व डोमेस्टिक विमानांचा समावेश असणार आहे.
नवे टर्मिनलमध्ये विविध प्रवासी सुविधा दिल्या आहेत. यात तीन व्हीआयपी व चार एक्झिक्युटिव्ह लाॅँजचा समावेश आहे. नवीन टर्मिनलमुळे १० विमानांचे पार्किंग करता येणार आहे. अत्याधुनिक नवीन इंटिग्रेटेड टर्मिनल हे पूर्णत: वातानुकूलित असेल. प्रतिवर्षी १ कोटी ९० लाख प्रवाशांना सामावण्याची त्याची क्षमता असेल. यात गर्दीच्यावेळी २ हजार ३०० प्रवाशांना (१ हजार ७००, देशांतर्गत आणि ६०० नग आंतरराष्ट्रीय सेवा देता येईल. या इमारतीत प्रवाशांना विमानापर्यंत पोहोचविणारे ५ नवीन मार्ग (पॅसेंजर बोर्डिंग ब्रिज), ८ स्वयंचलित जिने (एस्केलेटर), १५ लिफ्ट, ३४ चेक-इन काउंटर, प्रवासी सामान वहन यंत्रणा, आगमन क्षेत्रात पाच कन्व्हेयर बेल्टसह आदी अद्ययावत सुविधा इमारतीत असतील.
नवे टर्मिनल हे पर्यावरणपूरक असेल. त्यात खाद्यपदार्थ आणि दुकानांसाठी ३६ हजार चौरस फूट जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. याबरोबर पिण्याच्या पाण्याची सुविधा, सांडपाणी प्रक्रिया व्यवस्था तसेच सुसज्ज आणि अत्याधुनिक सुविधा असलेली प्रसाधनगृहे असतील.
कार्गोचे स्थलांतरचे काम सुरू :
नवीन टर्मिनल व जुने टर्मिनलमधील जागेत कार्गोची सेवा असल्याने दोन्ही टर्मिनलला एकमेकांना जोडणे अशक्य होते. कार्गोचे स्थलांतर करण्यासाठी पर्यायी जागा हवी होती. खासदार गिरीश बापट यांच्या प्रयत्नाने जागा मिळाली. आता जुन्या जागेतून नव्या जागेत कार्गोचे स्थलांतर करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे दोन्ही टर्मिनल एकमेकांना जोडणे सोपे होणार आहे.